आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराच्या झंझावातात ‘सेम टू सेम’ मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवापासून महाराष्ट्रातील प्रचाराचा झंझावात सुरू केला. मात्र त्यांच्याही आधी आणखी एका ‘मोदी’ने नांदेड जिल्ह्याच्या नायगाव मतदारसंघात प्रचार दौरे केले आहेत. त्यांच्या भाषणाला मोठी गर्दीही होत आहे. फरक फक्त एवढाच की, हे ‘मोदी’ उत्तर प्रदेशातील आहेत. हुबेहूब नरेंद्र मोदींसारखे दिसणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे नंदन मोदी. ते उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी असून भाजपच्या नेत्यांनी खास प्रचारासाठी त्यांना पंतप्रधान मोदींच्या आधी महाराष्ट्रात आणले आहे.
‘भाइयो और बहनो...’ असे म्हणत नंदन मोदी ग्रामीण भागात जनतेशी संवाद साधत आहेत. मोदींची प्रत्येक लकब त्यांनी अवगत केली आहे. या ‘स्टाइल’चा सुरेख पद्धतीने वापर करत नंदन मोदी भाजपचा प्रचार करत आहेत. त्यांची वेशभूषा, हालचाली हुबेहूब नरेंद्र मोदींप्रमाणे असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला जणू पंतप्रधानच आपल्या दारी आल्याचा सुखद धक्का बसत आहे. त्यांच्या सभांना गर्दीही होत आहे.

बीडमध्ये शनिवारी नरेंद्र मोदींची सभा सुरू असताना नायगावातही नंदन मोदींची सभा सुरू होती. अगदी त्याच स्टाइलमध्ये नंदन हे जनतेशी संवाद साधत भाजपला विजयी करण्याचे आवाहन करत होते. त्यांच्या भाषणामुळे उपस्थितांना मोदी आपल्या गावात आल्याची प्रचिती येत होती.
पोलिसांची सुरक्षा
नंदन मोदींना पाहण्यासाठी नायगाव परिसरात मोठी गर्दी होत आहे. तालुक्यातील तळेगाव, मन्नूर, गोळसा, राहाटी, हिळेगाव, इज्जतगाव, कोडगाव, गोळेगाव, हातनी, बेलदरा, नरंगल या गावांत त्यांनी सभा घेतल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठीही अक्षरश: रीघ लागत आहे. ‘मोदी, मोदी’ असे नारे देत तरुणाई त्यांच्यावर फिदा झाली आहे. ही गर्दी आवरण्यासाठी याही मोदींना सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागत आहे.
लोकसभेतही होते असेच डुप्लिकेट
लोकसभा प्रचारातही मुंबईत डुप्लिकेट मोदींनी प्रचार केला होता. विकास महंते असे त्यांचे नाव असून ते कपड्याचे व्यापारी आहेत. मुंबईतील केवळ भाजपच्याच नव्हे, तर शिवसेनेच्या प्रचार रॅलीतही महंते ऊर्फ मोदी सहभागी होत असत.