आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasik Vidhansabha Election News In Divya Marathi

पंचरंगी लढतीने नाशकात अनिश्चितता; मतविभाजनाने छगन भुजबळांचा मार्ग सुकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महायुती-आघाडी तुटल्यानंतर आता नाशिकमध्ये पंचरंगी लढती होणार हे निश्चित आहे. त्यामुळे आताआतापर्यंत जेथे महायुतीचे पारडे जड दिसत होते अशा ठिकाणच्या उमेदवारांना चांगलाच घाम फुटला आहे. सध्या जिल्ह्यातल्या १५ मतदारसंघातील सर्वाधिक चार शिवसेनेकडे, त्या खालोखाल प्रत्येकी तीन राष्ट्रवादी मनसेकडे, दोन काँग्रेसकडे, एक भाजपकडे, एक जनसुराज्यकडे तर एक अपक्ष अशी स्थिती आहे.
सध्या सर्वाधिक जागा शिवसेनेकडे असल्या तरी आता महायुती संपुष्टात आल्याने पुन्हा जिल्ह्यात क्रमांक एकवर राहाणे हे शिवसेनेसाठी मोठेच आव्हान असेल. त्यातही बबन घोलपांसारखा मोहोरा न्यायालयाच्या दणक्यानंतर रिंगणाबाहेर राहणार असल्याने या हक्काच्या जागेवरही शिवसेनेला अधिक मेहनत घ्यावी लागेल. अर्थात असे असले तरी घोलपांच्या नाशिक बाह्य मतदारसंघासह सध्याचे निफाड, मालेगाव बाह्य हे मतदारसंघ मजबूत पक्षबांधणीमुळे भाजपची साथ सोडल्यानंतरही शिवसेना आपल्या अधिपत्याखाली राखू शकते. शिवसेनेच्या ताब्यातील दिंडोरी मतदारसंघ मात्र युतीतल्या फाटाफुटीमुळे दोलायमान बनला आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या ताब्यातील एकमेव बागलान मतदारसंघातही शिवसेनेशिवाय लढताना भाजपला विजयाच्या फारच कमी आशा आहेत. दुसरीकडे आघाडीही फुटल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघही दोलायमान स्थितीत आहेत. येवला मतदारसंघात छगन भुजबळ यंदा महायुतीमुळे चांगलेच अडचणीत येतील, अशी चिन्हे होती. पण, आता बहुरंगी लढत भुजबळांच्या पथ्यावर पडू शकते. त्याउलट त्यांचे पुत्र पंकज हे मात्र बहुरंगी लढतीमुळे नांदगावात बॅकफूटवर जाऊ शकतील. कळवणला राष्ट्रवादीच्या ए. टी. पवारांचे हौसले सुद्धा बहुरंगी लढतीमुळे काहीसे बुलंद झाले आहेत. काँग्रेसकडील सिन्नर इगतपुरी या जागा तर प्रचंड अडचणीत आल्या आहेत. सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे हे भाजपकडून उभे राहिल्यास येथे शिवसेना विरुद्ध भाजप अशीच प्रमुख लढत होऊ शकते. नाशिक शहरातील पूर्व, पश्चिम मध्य हे तिन्ही मतदारसंघ मनसेकडे आहेत. मात्र, गतवेळच्या तुलनेत मनसेची हवा ओसरली आहे. त्यामुळे मनसेला किमान त्यातल्या दोन जागांवर पाणी सोडावे लागू शकते. मनसेचे तगडे उमेदवार वसंत गिते यांनाही निवडणूक गतवेळसारखी सोपी निश्चितच नाही. मालेगाव बाह्यमध्ये आमदार दादा भुसे यांना भाजपकडून अद्वैत हिरे यांच्याबरोबरच इतर मातब्बरांचे आव्हान असेल.