आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी - श्रीगोंदे मतदारसंघातील पाचपुते-जगताप यांची लढत ठरणार लक्षवेधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनराव पाचपुते (भाजप) विरुद्ध राहुल जगताप (राष्ट्रवादी) या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जगताप यांच्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून पाचपुते आठव्यांदा रिंगणात उतरले आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी व कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुंडलिकराव जगताप पहिल्यांदाच विधानसभेसाठी नशीब अजमावत आहेत. शरद पवारांना आव्हान देत राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या पाचपुतेंना भाजपने पावन केल्यानंतर पवार कुटुंबीयांनी श्रीगोंद्याच्या राजकारणात कमालीचे लक्ष घातलेले आहे. पाचपुते विरोधकात असणारी बेकी दूर करून त्यांच्यात ऐक्य घडवण्याचे सर्वात अवघड काम पवारांनी केले. पंचायत समिती पाचपुते समर्थकांच्या ताब्यात जाऊ दिली नाही. राहुल जगताप या तरुण उमेदवाराला अनुभवी पाचपुते पुढे मैदानात उतरवले. निवडणूक प्रचार यंत्रणेवर स्वत: पवार लक्ष ठेवून आहेत. श्रीगोंदे मतदारसंघातील हालचालींचा ते रोजच्या रोज आढावा घेत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या निकट सूत्रांकडून समजली.

श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात पंधरा उमेदवार रिंगणात उतरले तरी मुख्य लढत बबनराव पाचपुते (भाजप), राहुल जगताप (राष्ट्रवादी), प्रा. शशिकांत गाडे (शिवसेना) व हेमंत ओगले (काँग्रेस) यांच्यातच होत आहे. प्रा. गाडे यांच्यासाठी वाळकी व चिचोंडी पाटील या दोन गटांत प्रचार यंत्रणा जोरात राबत आहे. श्रीगोंदे तालुक्यात तुलनेने गाडेंचा प्रचार धीमा पडला आहे. शिवसेनेकडे तालुक्यात सत्ता व संघटन नसल्याने गाडे यांना निवडणुकीत आव्हान उभे करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. काँग्रेस उमेदवार हेमंत ओगले यांची देखील हीच स्थिती आहे. काँग्रेसचे बडे नेते व ज्येष्ठ कार्यकर्ते हे राहुल जगताप यांच्या प्रचारात उघडपणे सक्रीय आहेत. निवडक कार्यकर्त्यांसह ओगले यांना प्रचाराचा गाडा हाकावा लागत आहे. काँग्रेसच्या हाय कमांडचे ओगले यांना जरी आशीर्वाद असले तरी स्थानिक परिस्थती ओगले यांना सध्या तरी अनुकूल दिसत नाही.

श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील या चौरंगी लढतीत सध्या तरी राहुल जगताप व आमदार पाचपुते यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. जगतापांच्या दृष्टीने सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांची पाटी पूर्ण कोरी आहे. उमेदवार नवखा असल्याने पाचपुते राहुल जगतापांवर जोरकस टीका करू शकत नाही. उलट जगतापांकडून पाचपुतेंना दररोज लक्ष्य केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांची विशेषत: माजी आमदार शिवाजीराव नागवडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर आदी जगताप यांच्या प्रचारातील सक्रीयता राष्ट्रवादीचे अवसान वाढवत आहे. तरुणांचा मिळणारा प्रतिसादही राहुल जगताप यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

आमदार बबनराव पाचपुते यांची ही आठवी निवडणूक असल्याने अनुभवाच्या दृष्टीने ते पुढे आहेत. राजकीय संकट गहिरे झाले, तरी त्यास कसे तोंड द्यायचे, याचे धडे त्यांनी पूर्वी गिरवले आहेत. निवडणुकीचे प्रतिकुल वातावरण शेवचटच्या चार दिवसांत फिरवण्याचा त्यांचा हातखंडा आहे. पाचपुते - जगताप यांच्यातील लढत तुल्यबळ, तर आहेच. शिवाय ती राज्यभर गाजणारी देखील आहे. पाचपुतेंनी पवारांनाच आव्हान दिल्याने त्यांनी आग्यामोहळाला दगड मारल्याची प्रतिक्रीया राजकीय वर्तुळातून उमटत आहे. जगताप यांच्या विजयापेक्षा पाचपुतेंचा पाडाव हा पवारांनी प्रतिष्ठेचा केला आहे. नवतरुण विरुद्ध सिनिअर या संघर्षात काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आघाडी फुटली, तरी श्रीगोंद्यात ऐक्य कायम
ज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडी असताना श्रीगोंदे तालुक्यात कधीही दोन पक्षांचे मनोमिलन झाले नव्हते. राज्यभर आघाडी तुटल्यानंतर स्थानिक राजकीय संदर्भ समोर ठेवून येथे दोन्ही पक्षांत मात्र ऐक्य झाले आहे. काँग्रेसवाल्यांपुढे राष्ट्रवादीही शत्रू नसून पाचपुते हेच त्यांचे मुख्य टार्गेट आहेत. पाचपुतेंचा वारू यंदा रोखला नाही, तर तालुक्यातून पाचपुतेंना विरोधकच राहणार नाही. या भीतीने काँग्रेसवाले राहुल जगताप यांच्या मागे उभे आहेत.