पुणे- देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्ष स्वत:च्या ताब्यात घेतला आहे. एवढेच नव्हे तर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मोदींनी अडगळीत टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. अजित पवारांनी आज (सोमवार) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी सहा वाजता थंडावणार आहेत, या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी बारामतीतील सभेत पवार कुटुंबियांवर घणाघाती टीका केली होती. पवार कुटुंबीयांनी बारामतीकरांना गुलाम केल्याचे मोदींनी म्हटले होते. त्याला अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी भापज पक्षावर ताबा घेतला आहे. भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना मोदी यांनी अडगळीत टाकले आहे. भाजपच्या प्रचारात राज्याबाहेरील नेते दिसत आहेत. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कुठेच कसे दिसत नाहीत, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. मात्र, नरेंद्र मोदींना डोक्यावर घेतलेल्या भाजप नेत्यांना लवकरच त्यांची जागा कळेल, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बारामती मॉडेलचे कौतुक केले आहे. मात्र विद्यमान पंतप्रधान पवार कुटूंबियांचा खोटा प्रचार करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.