पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी एवढ्या सभा घेण्याची ही पहिली वेळ असल्याचे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, सीमेवर धुमश्चक्री सुरु असताना पंतप्रधान मोदींनी भाजपच्या प्रचाराला प्राथमिकता दिली आहे. असे पंतप्रधान प्रथमच पाहायला मिळाले, असा टोलाही त्यांनी हाणला. कोथरुड येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
मतदारांना आवाहन करतान अजित पवार म्हणाले, ' दुसर्या पक्षांचे नेते नागपूरमधून, मुंबईतून येऊन तुम्हाला आश्वासन देतील पण मी इथलाच आहे. पुण्याचे आणि माझे नाते अतूट आहे, भावनिक आहे. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार निवडून द्यावेत, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
मोदींची प्राथमिकात प्रचाराला
अजित पवारांनी पंतप्रधानांच्या राज्यातील सभांवर टीका केली. ते म्हणाले, 'सीमेवर पाकिस्तान - चीन घुसखोरी करत आहेत,
आपले जवान शहीद होत असताना पंतप्रधान विधानसभा निवडणुकीचा प्रचारकरण्यासाठी फिरत आहेत.' विधानसभा निवडणुकांमध्ये इतका रस असलेला दुसरा पंतप्रधान पाहिला नसल्याचे सांगत पवार म्हणाले, 'आम्ही अनेक पंतप्रधान पाहिले, मात्र विधानसभा निवडणुकीसाठी एवढ्या सभा एखाद्या पंतप्रधानांनी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीमेवर गोळीबार सुरु असताना पंतप्रधानांनी तीन्ही दलांच्या प्रमुखांना बोलावून काय कारवाई करता येईल यासंबंधीचा विचार केला पाहिजे, तर आपले पंतप्रधान भाजपचा प्रचार करण्यात धन्यता मानत आहेत.' अशी टीका त्यांनी केली.