मुंबई- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि मातंग समाजाचे नेते आमदार प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचे तिकीट कापण्याच्या हालचाली राष्ट्रवादी पक्षात सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या हालचालींमागे असून ढोबळे यांच्या मतदारसंघातून मुंबईच्या रमेश कदम यांना या वेळी तिकीट देण्याचा निर्णय पवारांनी घेतल्याची माहिती "दिव्य मराठी'ला मिळाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे राजन पाटील यांचा आहे. सध्या तो अनुसूचित जातीसाठी
राखीव आहे. त्यामुळे मागच्या विधानसभेला येथून मंगळवेढ्याच्या प्रा. लक्ष्मण ढोबळे यांना उमेदवारी मिळाली. ढोबळे निवडून आले आणि मंत्रीही झाले, पण शरद पवार यांच्या तालमीतील ढोबळे हे छोट्या पवारांना पसंत नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच ढोबळे यांचा लाल दिवा गेला.
संधीचे सोने केले
ढोबळे यांना बाजूला करताना मातंग समाजात दुसरे नेतृत्व उभे राहील याची राष्ट्रवादीने तजवीज केली. ढोबळे यांचे उजवे हात रमेश कदम यांनाच राष्ट्रवादीने हेरले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले. कदम यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. राष्ट्रीय अनुसूचित जाती विकास महामंडळाकडून १७ पट अधिक निधी खेचून आणला. महामंडळाच्या कर्जवाटपाचा कारभार ऑनलाइन केला. कर्जवाटपातील दलाली संपुष्टात आणली.
अस्वस्थ मातंग समाज : लोकसभेला अनुसूचित जातीसाठी राज्यात मतदारसंघ राखीव आहेत. तरीही एकाही पक्षाने मातंग उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे सध्या मातंग युवक अस्वस्थ आहेत. राज्यात मातंग समाजाची ७० लाख लोकसंख्या असून, २० विधानसभा मतदारसंघात मातंग समाजाची मते निकालाचे पारडे बदलवू शकतात. ढोबळेंबद्दल मातंग समाजाला सहानुभूती असून, त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे.
स्वस्त भाजीपाला चर्चेत
विधानसभा डोळ्यासमोर ठेवून रमेश कदम यांनी मुंबईत मातंग युवा परिषद भरवली. अजित पवार त्याचे उद्घाटक होते. कदम यांची मुंबईत "जोशाबा' नावाची संस्था आहे. त्यामार्फत ते स्वस्त भाजीपाला विक्री करतात. ढोबळेंचे कट्टर अनुयायी असलेले कदम यांनी आता ढोबळेंनाच पाठ दाखवून अजित पवार यांचे शिष्यत्व पत्करले आहे. ढोबळे यांनी स्वत:चा मतदारसंघ बांधला नाही. त्यात नुकताच त्यांच्यावर बलात्काराचाही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तिकीट कापल्यास ढोबळे बंडखोरी करण्याची सुतराम शक्यता नाही.