नेवासा (नगर) - जाहीर प्रचाराचे शेवटचे दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक प्रचाराला सुरवात केली आहे. भाववाढ करुन महिलांची अडवणूक करणार्या पंतप्रधान
नरेंद्र मोदींची गाडी आडवण्याची धमकी त्यांनी दिली आहे. त्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे बोलत होत्या. शेतमालाच्या भाववाढीवर आंदोलन करणार्या नेत्यांवर टीका करताना त्या म्हणाल्या, कांद्याच्या भाव वाढीसाठी लोक आंदोलन कुठे करतात, तर बारामतीमध्ये. 'आता कांद्याच्या भाववाढीचा आणि बारामतीचा काय संबंध', असा सवाल त्यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उल्लेख टाळून त्या म्हणाल्या, 'आंदोलन करणारे रस्ते कुठले आडवतात तर सातार्यातले.' सुप्रियांनी आंदोलकांना आव्हान दिले, 'कांदा, डाळिंब यांच्या दरवाढीसाठी रस्ताच आडवायचा असेल तर दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींचा रस्ता आडवा.'
शिवसेना - भाजप नेत्यांवर सुप्रिया सुळें यांनी जोरदार हल्ला बोल केला. युती शिवजयंतीच्या खडंणीच्या वाटणीवरुन तुटली का? असा सवाल त्यांनी दोन्ही पक्षांना विचारला. गडकरींच्या 'पैसे घ्या, दारु प्या' या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.
मोदी दिल्लीत संत आणि राज्यात आले की अफझल खान का?
शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतरही अनंत गिते केंद्रात सत्ता कसे उपभोगतात? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर हल्लाबोल केला. 'दिल्लीत सत्ता उपभोगायची असले तर मोदी तुमच्यासाठी संत आहेत आणि ते राज्यात आले की अफझल खान होतात का?' असा सवाल त्यांनी केला. नितीन गडकरी भर सभेत लोकांना पैसे घ्या आणि दारू प्या असा सल्ला देत आहेत, अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का? असा सवाल सुळे यांनी येथील प्रचारसभेत केला. नेवासा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकरराव यशवंतराव गडाख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांनी महिलांशी ग्रामीण भाषेत संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.
सभेला महिलांची संख्या लक्षणीय होती, त्यावरुन सुप्रिया यांनी बारामतीमधील प्रचाराच्या जुन्या आठवणी जागवल्या. त्या म्हणाल्या, जेव्हा लहानपणी मी पवारसाहेबांच्या प्रचार सभांना जात होते, तेव्हा कुठेतरी एखादी महिला दिसत होती. आज येथे पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत बसलेल्या महिला पाहून अभिमान वाटत आहे. 'महिलांना सर्वकाही कळतं. त्या जरी घरात राहात असल्या तरी जगात काय चालू आहे याची चाहूल त्यांना कायम असते.' असे सांगत महिलांना 50 टक्के जागा असल्या पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
गडकरींच्या वक्तव्याचा समाचार
लक्ष्मीदर्शनाचा काळ आहे. पैसे घ्या, दारू प्या असे आवाहन भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लातूर येथील सभेत केले होते. त्याचा सुप्रिया सुळेंनी खरपूस समाचार घेतला. सभेला बहुतांश महिला असल्याने सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'तुमच्या नवर्याला, भावाला, मुलाला व्यसनाधीन करण्याचे आवाहान भरसभेत हे नेते करत आहेत. तुम्ही अशा पक्षाच्या लोकांना निवडून देणार का?' असा सवाल त्यांनी महिलांना विचारला. त्यावर प्रेक्षकांमधून एकच 'नाही'चा आवाज घुमला. यावेळी सुळे यांनी गडकरींच्या वक्तव्याच्या छापून आलेल्या बातम्याही झळकवल्या.
अफझल खान कोण, शिवसेनेने स्पष्ट करावे
शिवसेनेवर हल्ला करताना त्या म्हणाल्या, भाजप-शिवसेना युती कोणत्या प्रश्नावर तुटली याचे उत्तर जरा एकदा उद्धव ठाकरे यांनी दिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या नावाने शिवसेना खंडणी गोळा करत असल्याचा आरोप केला आहे. या खंडणीतील वाटणीवरुन यांची युती तुटली का? असा सावल त्यांनी केला.
त्यासोबतच उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये अफझल खानाचा उल्लेख करत आहेत, त्यांनी एकदा स्पष्ट करावे हा अफझल खान नरेंद्र मोदी आहे की, अमित शाह? असेही त्या म्हणाल्या.
नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शंकरराव गडाख रिंगणात आहेत. ते सुसंस्कृत तरुण असून त्यांनाच विजयी करण्याचे आवाहन सुळे यांनी केले.