आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP MP Supriya Sule Attack On PM Narendra Modi At Ashti Rally

मोदीसाहेब भ्रष्टाचाराचे आरोप आधी सिध्द करा, नाही तर गाठ माझ्याशी आहे - सुप्रिया सुळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी / बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पन्नास वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेले आरोप आधी सिद्ध करावे, मगच बोलावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टीकचे लक्ष केले होते. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला 'भ्रष्टाचारवादी' म्हणून त्यांनी पक्षाची संभावना केली. मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी 'आधी आरोप सिद्ध करा नाही तर गाठ माझ्याशी आहे,' असा दम भरला आहे. त्या बीड जिल्ह्यातील आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले डॉ. विजयकुमार गावित आणि पक्ष नेतृत्व कार्यकर्त्यांचे ऐकत नसल्याचा आरोप करुन बाहेर पडलेले बबनराव पाचपूते यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीत असतांना पाचपुते व गावीत यांच्यावर भाजपानेच आरोप केलेले आहेत.त्यांना पक्षात घेतले की ते संत झाले का ? राज्यातील भाजपात दमच नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडे नेता नाही. त्यामुळे मोदींना राज्यात 24 सभा घेण्याची वेळ आली आहे.राष्ट्रवादीवर केलेले मोघम आरोप आम्ही सहन करणार नाहीत.मोदींनी आमच्यावर आरोप करण्यापुर्वी विचार करावा. शरद पवार व त्यांच्या घरातील संस्कार वेगळे आहेत.
नितीन गडकरींवर डागली तोफ
सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यावर तोफ डागली. त्या म्हणाल्या, 'मोदी साहेब ,तुमचे एकमंत्री लोकांकडून पैसे घ्या आणि मतदान भाजपला करा असे म्हणतात. हा भ्रष्टाचार नाही का ? असा सवाल केला. त्या म्हणाल्या, 'निवडणूकीत लक्ष्मी चालुन आली तर नाही म्हणु नका असे म्हणुन राजरोस पैसे घेण्याचे सांगणारे नितीन गडकरी यांना राजकारणातुन हद्दपार केले पाहीजे. राजकारण विचारांवर तत्वांवर असावे.' राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत देण्याचा आवाहन करताना त्या म्हणाल्या, 'बीड जिल्ह्याने पवारांना कायम साथ दिली आहे. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील परंतु जास्त काम जो करतो तोच चुकू शकतो.'

ताईंचा असाही प्रचाराचा फंडा
सभेला महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हजारो महिलांकडे पाहुन सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपण दररोज भाकरी थापतांना मालकाला राष्ट्रवादी... राष्ट्रवादी अशी हाक द्या. सर्व नवरोजी मतदान यंत्रापर्यंत जाईपर्यंत त्यांच्या कानात हाच आवाज घुमला पाहीजे.असा निवडणुकीचा मंत्र त्यांनी दिला.