नंदुरबार- ‘पृथ्वीराज चव्हाण हे आतापर्यंतचे सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्राची वाट लावलीय. राज्यात एक नंबरवर असलेला प्रगतिशील महाराष्ट्र चव्हाणांनी सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवला आहे. राज्यातील १० हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्त्या केल्यात. काँग्रेस -राष्ट्रवादीचे हे सरकार राज्याला पुरेशी वीजही देऊ शकलेले नाही. सिंचनाचाही विकास झाला नाही,’ अशा शब्दांत केंद्रीय परिवहन मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी रविवारी आघाडी सरकार व मुख्यमंत्र्यावर टीकेची झोड उठवली.
माजी मंत्री व भाजपचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबारमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. ‘सबका साथ, सबका विकास' हेच भाजपाचे धोरण आहे, असे सांगत अमरावती- सुरत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा तीन महिन्यांत या शुभारंभ करण्यात येईल, अशी घोषणाही गडकरींनी केली. खासदार डॉ. हिना गावित, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेनेचा उल्लेख टाळला : धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम पुढील वर्षी केंद्र सरकार सुरू करणार आहे, असे मत नितीन गडकरी यांनी शिंदखेडा येथील जाहीर सभेत सांगितले. शेतीवर आधारित प्रकल्प उभारण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. त्यातून ग्रामीण भागाचा विकास होणे शक्य असल्याचा दावाही त्यांनी केला. विशेष म्हणजे खान्देशातील पहिल्याच सभेत गडकरींनी
आपला पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष शिवसेनेबद्दल एक शब्दही काढला नाही.