आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्ज दाखल करण्यासाठी भागमभाग, ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाल्याने धावपळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 48 तास शिल्लक असताना महायुती व आघाडीने घटस्फोट घेतला. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भागमभाग करावी लागली. काहींना ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने त्यांची धावपळ झाली. विविध पक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे शहराची लाइफलाइन समजला जाणारा जालना रोडवरील चिकलठाणा केंब्रिज स्कूल ते बाबा पेट्रोल पंपापर्यंत दुपारी 11 ते 3 वाजेदरम्यान वाहतुकीची कोंडी झाली होती.
उमेदवारांना अर्ज घेणे, शपथपत्र तयार करणे, रॅलीसाठी कार्यकर्ते जमवणे व निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल करणे यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना मुकुंदवाडी येथील टेलिफोन भवनच्या जुन्या इमारतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे मुकुंदवाडी ते चिकलठाणादरम्यान शुक्रवारी विविध पक्षांच्या उमेदवारांनी रॅली काढून अर्ज दाखल केले.
अशी झाली भागमभाग :
माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांना उमेदवारी निश्चित झाल्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. बुधवारी धर्मवीर संभाजी विद्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मोबाइलवर संपर्क केला आणि दोघांमध्ये झालेले संभाषण कार्यकर्त्यांना ऐकवले. त्यानंतर कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला व ते कामाला लागले. रॅलीची जबाबदारी माजी सभापती नारायण कुचे यांच्यावर होती, परंतु ऐनवेळी त्यांना बदनापूर या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांनी बोगडेंच्या सभेच्या परवानगीचे सोपस्कार पूर्ण न करताच आपल्या समर्थकांसह बदनापूर गाठले. या वेळी बागडे समर्थकांची भागमभाग झाली. या गोंधळामुळे त्यांना पोलिस परवानगीअभावी सभेचे रूपांतर बैठकीत करावे लागले.

काळेंच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी :
फुलंब्रीचे काँग्रेस उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी चिकलठाणा येथून रॅली काढली. त्यांची रॅली सुरू झाल्यानंतर जालना रस्त्यावरील म्हाडा कॉलनीशेजारी राष्ट्रावादीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांची सभा सुरू होती. त्यांच्या सभेसमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे यांना उचलून घेत घोषणाबाजी केली. यामुळे धूत हॉस्पिटल येथून एमआयडीसीकडे वाहतूक एकाच बाजूने वळवण्यात आली.

आमदार सतीश चव्हाणांची तगमग :
अनुराधा चव्हाण यांचा अर्ज भरतेवेळी आमदार सतीश चव्हाण यांना उपस्थित राहण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे ते मुकुंदवाडी येथे हजर झाले. त्यांना विनोद पाटील यांच्याकडेही उपस्थिती लावायची होती. त्यामुळे त्यांची तगमग सुरू होती. माजी मनपा सभापती मोतीलाल जगताप, विनोद पाटील, सीमा थोरात, नगरसेवक अभिषेक देशमुख, नासेर खान उपस्थित होते.
वासनिकांची दमछाक : पश्चिममधून काँग्रेसकडून जितेंद्र देहाडे यांनी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. पूर्वमधून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी अर्ज दाखल करताना वासनिक यांना सोबत राहण्याची विनंती केली. त्यानंतर देहाडे व दर्डांची रॅली एकत्रच निघाली. वासनिक यांनी देहाडेंसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात, तर दर्डांसाठी तंत्रनिकेतन महाविद्यालयात हजेरी लावली.
इच्छुक गायब, पाहुणेच धावले बागडेंच्या मदतीला
फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी चौदा पदाधिकारी इच्छुक होते. हरिभाऊ बागडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अन्य इच्छुक गायब झाले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपत प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी मंत्री नामदेव गाडेकर, शिवाजी पाथ्रीकर व सुहास शिरसाट यांची उपस्थिती होती. भाजपचे हार्डकोर कार्यकर्ते असलेले आसाराम तळेकर, भाऊसाहेब दहिहंडे, सुरेंद्र साळुंके, विकास दांडगे, एकनाथ जाधव, डॉ. भागवत कराड, विवेक चव्हाण आदींची अनुपस्थिती होती. त्यामुळे पाहुणे आले, परंतु स्वकीयांचीच अनुपस्थिती असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.