आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Family Members In Different Partys News In Divya Marathi

आमदारकीसाठी गोतावळा पॅटर्न! सत्ता कुठेही गेली तरी घरात नांदलीच पाहिजे ना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काहीही करू पण सत्ता घराण्यातच ठेवू, हा एककलमी कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक राजकीय घराणी अनेक वर्षांपासून राबवत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक तरी त्याला अपवाद कशी ठरेल? सत्ता कुणाचीही आली तरी "मलिदा' लाटता यावा यासाठी व्यूहरचना आखण्यात अनेक नेत्यांनी नैपुण्य मिळवले आहे. मुले, पुतण्या, मेव्हणा, भाऊ अशा जवळच्यांना मिळेल त्या पक्षात पाठवायचे आणि उमेदवारी मिळवायची. मग निवडून आणण्यासाठी कुटुंबात कुणी पक्षभेद पाळायचा नाही, असा हा पॅटर्न आहे. येथे पक्षाची विचारसरणी आणि विकास या बाबी मात्र गौण ठरताना दिसतात. गोतावळा पॅटर्नमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महादेव महाडिक, सांगली जिल्ह्यातील प्रकाश शेंडगे, अकलूजचे विजयसिंह मोहिते, धुळ्याचे रोहिदास पाटील आणि नंदुरबारचे डॉ. विजयकुमार गावित या राजकीय घराण्यांनी मोठीच आघाडी घेतली आहे.
1. कधीकाळी काँग्रेसचे मंत्री राहिलेल्या शिवाजीराव शेंडगे यांचे पुत्र प्रकाश शेंडेगे यांनी भाजपकडून दोनदा आमदारकी भोगून आता राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली. त्यांच्या घरातील कुणी काँग्रेस तर कुणी राष्ट्रवादीकडून रिंगणात आहे. शिवसेनेचा वापरही यांनी केला आहे.
2. स्वत: काँग्रेसचे १२ वर्षांपासून आमदार, पुतण्या राष्ट्रवादीचा खासदार, मुलगा भाजपचा विधानसभेसाठीचा उमेदवार आणि भाऊ सर्वपक्षीय आघाडीत अशी चौपक्षीय कामगिरी कोल्हापूरच्या महाडिक कुटुंबीयांनी केली आहे.
3. काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी मुलाला काँग्रेसची, मेहुण्याला शिवसेनेची उमेदवारी मिळवून दिली आहे, तर पुतण्याला अपक्ष उभे केले आहे.
4. अकलूजच्या मोहिते घराण्यातील विजयसिंह मोहिते यांनी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपद उपभोगले. त्यांचे बंधू प्रतापसिंह भाजपचे खासदार आणि नंतर काँग्रेसकडून आमदारकी मिळवली. या कसरतीत भावाभावात दुरावा निर्माण झाला.

5. राष्ट्रवादीकडून मंत्री राहिलेल्या डॉ. विजयकुमार गावितांनी मुलीला भाजपकडून खासदार बनवले. आता ते स्वत: भाजप आणि दोन बंधू राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत.

6. ज्येष्ठ नेते रणजित देशमुख काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारी मिळवलेल्या आपल्या मुलांच्या प्रचारात रमले आहेत.