आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Modi\'s Stratagy Of Maharashtra Assembly Election 2014

मोदींना विचारायची वेळ येऊ नये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या नऊ दिवसांमधील महाराष्ट्रातील प्रचारसभांचा झंझावात डोळ्याचे पारणे फेडणारा होता. सोमवारी सायंकाळी ५वाजता राज्यातील प्रचारतोफा थंडावतील. परंतु या संपूर्ण प्रचारात राज्यभरात एकच तोफ दिसून आली. ती होती नरेंद्र मोदी यांची!. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सभाही मोदींपुढे फिक्या पडल्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभांना ब-यापैकी गर्दी होती. परंतु मोदींच्या सभेसारखी गर्दी त्यांना जमवता आली नाही. गर्दी पाहून नरेंद्र मोदी घसा बसेपर्यंत किंचाळले. महाराष्ट्राला देशात नंबर वन करण्याच्या त्यांनी वल्गना केल्या.
गुजरातपेक्षाही महाराष्ट्र पुढे नेऊन ठेवतो, असे त्यांनी सांगितले. देशाचा पंतप्रधान गुजरातच्या बाहेर पडत नसल्याची बोचरी टीका विरोधकांनी केली असली तरी आत्ममग्न असलेल्या मोदींना कोणाचेही काही देणेघेणे नाही. मोदी गर्दीचा अंदाज घेतात आणि त्यानुसार डावपेच टाकतात. राज्यातील प्रत्येक सभा मोदींनी जिंकली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनाही खूप गर्दी असायची. त्यांना ऐकण्याचा, त्यांच्या नकला पाहण्याचा आनंद लोकांना मिळायचा. परंतु ही गर्दी मतपेटीकडे कधीच गेली नाही. मराठी भाषकांच्याच नव्हे तर हिंदुत्वाचा पुरस्कार करणा-यांच्या मनात बाळासाहेबांबाबत प्रचंड आदर निर्माण झाला; परंतु या प्रेमाची परतफेड त्यांनी एकहाती सत्ता देऊन कधीच केली नाही.

इथे चित्र वेगळे आहे. मोदी गर्दी करतात अन् हे लोंढे मतपेटीकडे वळतात. लोकसभेत ते अनुभवायला मिळाले. थोड्याफार फरकाने तसेच चित्र महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालात दिसून येण्याची शक्यता आहे. परंतु गेल्या वेळी मोदींना देशासाठी मते देण्यात आली. या वेळी त्यांना महाराष्ट्रासाठी मते देऊ असा समज या राज्यातील जनतेचा असेल तर ती स्वत:चीच फसवणूक ठरण्याची शक्यता बळावणार आहे. त्यांनी महाराष्ट्राबाबत जी आत्मीयता व्यक्त केली त्यात पारदर्शकता नाही. मोदींकडून महाराष्ट्रविरोधी कृती घडते आणि भाजपचेच महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील मराठी नेते, मंत्री तोंडावर बोट ठेवून बसतात. मोदींपुढे ‘ब्र’ काढण्याची कोणाची हिंमत नाही. शिवसेनेसारख्या सख्ख्या मित्राला ठेंगा दाखवणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी निर्माण केलेली भारतीय जनता पार्टी मोडीत काढायला निघाले आहेत तिथे इतरांची गय नाही.
मोदी-शहा यांचा भाजप असे नावारूपास आल्यास ते भाजपवाल्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय उरणार नाही. याबाबत लालकृष्ण अडवाणी यांना प्रचंड यातना आहेत, परंतु त्यांचे हे दु:ख समजून घ्यायला कोणाला वेळ नाही. जे-जे अडवाणींपुढे श्रद्धेने झुकत त्यांना केंद्रात मंत्रिपदे मिळाल्याने तेही अडवाणी यांच्या ३०, पृथ्वीराज मार्गावरील निवासस्थानाकडे फिरकत नाहीत. मोदींचे मार्केटिंग हे आत्मकेंद्री. माझ्यामुळे अमेरिकेत कसा उजेड पडला हे वारंवार सांगून याआधी जे पंतप्रधान, नेते अमेरिकेत जाऊन आले, त्या सगळ्यांनाच ते कमी लेखताहेत. न्यूयॉर्कमधील सभेेमागील मंडळी कोण होती यावरही दृष्टिक्षेप टाकावा म्हणजे व्यापारी मनाच्या पंतप्रधानांची ओळख होईल. मोदींनी महाराष्ट्रातील सागरी अकादमी गुजरातला पळवली मोदींनी महाराष्ट्रातील सागरी अकादमी गुजरातला पळवणे यातच त्यांचा कुत्सितपणा दिसून येतो. २६/११ ला मुंबईवर सागरी मार्गातून झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे समुद्रतटीय सुरक्षा अधिक सक्षम असावी म्हणून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने राष्ट्रीय अकादमी उघडण्याचा निर्णय घेतला होता. या सागरी अकादमीमध्ये अद्ययावत प्रशिक्षण देऊन भारताची तटीय सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला होता.
साडेचारशे एकर जमिनीवर अकादमी उभारण्याचा निर्णयही झाला. ज्या राज्यांना समुद्रकिनारा आहे आणि विशेषत: ज्या राज्यांना दहशतवादाचा, घुसखोरांचा सामना करावा लागतो, अशा राज्यांतच ही अकादमी उभारण्याची कल्पना होती. त्यानुसार ही अकादमी महाराष्ट्रात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे प्रकरण गृह विभागाच्या मान्यतेसाठी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे आले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ही अकादमी गुजरातच्या सागरी तटावर उभारण्यासाठीचा त्यात प्रस्ताव होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याचे संकेत मिळत असल्याने संरक्षण आणि गृह मंत्रालयातील चलाख अधिका-यांनी मोदींना महाराष्ट्रात सागरी अकादमी उभारली जात असल्याचे सांगितले होते. पदावर आरूढ होण्याआधीच मोदींनी प्रशासनात हस्तक्षेप करायला सुरुवात केली असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले होते. शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बोलावून घेऊन या अकादमीसाठी महाराष्ट्रात सरकार जागा उपलब्ध करून देणार असल्याचा संपूर्ण प्रस्ताव तयार केला आणि सरतेशेवटी गुजरातचा घाट घातलेली ही अकादमी महाराष्ट्रास दिली गेली. राज्य सरकारने पालघरमध्ये केंद्राला साडेचारशे एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला. या अकादमीमध्ये दरवर्षी १० हजार सागरी तटरक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण मिळणार होते. ही देशातील सर्वात मोठी अकादमी ठरणार होती.
महाराष्ट्रातील तरुणांना यानिमित्ताने नोकरीच्या संधी उपलब्ध होणार होत्या आणि या अकादमीमुळे महाराष्ट्राच्या मानात एक तुरा रोवला जाणार होता. पंतप्रधान होण्याआधीच महाराष्ट्रापासून ही अकादमी हिरावून घेण्याचा प्रयत्न करणा-या मोदींनी सत्ता आल्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांना महाराष्ट्रातून ही अकादमी गुजरातमध्ये नेण्याचे फर्मान सोडले. देशाचे पंतप्रधान असलेल्या मोदींच्या डोक्यात प्रांतवाद ठासून भरला असल्याचे दर्शन झाले. राजनाथसिंग यांनी तशी घोषणा केली. दु:ख याचे आहे की केंद्रीय मंत्रिमंडळात हा निर्णय घेताना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणा-या मंत्र्यांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. शिवसेनेच्या खासदारांनी याला विरोध दर्शवला असला तरी दबंग मोदींपुढे त्यांना अधिक काही करता आले नाही. हिरावून घेण्याची मानसिकता असलेले मोदी महाराष्ट्राला नंबर एकवर नेऊन ठेवण्याची भाषा बोलत असतील तर ती महाराष्ट्रातील जनतेची शुद्ध फसवणूक ठरणार आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबाई मुंबईतील उद्योगपतींना गर्दीमुळे येथील उद्योग गुंडाळा नि गुजरातमध्ये चला असे सांगण्याचे धाडस करण्यामागे मोदी शक्ती नसेल कशावरून? भाजपचा एकही लाल यावर आक्षेप नोंदवू शकला नाही. महाराष्ट्रविरोधी कुटिल डावांची मानसिकता असलेल्या नरेंद्र मोदी-अमित शहा-आनंदीबाई या प्रवाहास थांबवण्याचे धाडस नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यात आज तरी नाही!.