आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Modi Factor In Maharashtra Assembly Election By Sanjiv Unhale

मोदींचा अश्वमेध अडवला जाईल काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील एकमेवाद्वितीय, एकचालुकानुवर्ती व देशावर एकछत्री अंमल करू इच्छिणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक सभांमुळे महाराष्ट्रातील वातावरण पालटले आणि आता केवळ भाजपची सत्ता येणार असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. भाजपला एकट्याला सत्ता स्थापन करता येणे शक्य नसले तरी स्वबळाचा मोठा आकडा दृष्टिपथात असल्याने जणू आता निवडणूकच होणार नाही असे वातावरण निर्माण झाले आहे.

ही हवा मोदीमय झाली असली तरी प्रत्यक्ष मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे हे चांगली यंत्रणा असेल तरच घडू शकते. त्यामुळे ज्या भाजपच्या मतदारसंघात ही यंत्रणा आहे तेथील विजय सुकर होईल असे दिसते. मात्र मोदींचा अश्वमेध अडवला जाईल काय, हे पाहणेही कुतूहलाचे असेल हे मात्र नक्की.

तथापि, विधानसभेची निवडणूक ही लोकसभेप्रमाणे लाटेवर स्वार होऊन जिंकता येणार नाही. अनेक स्थानिक प्रश्न, त्याला असलेले पिढीजात वादाचे कंगोरे, जातीची गणितं आणि त्यात पुन्हा बहुरंगी सामने यामुळे प्री-ओपिनियन पोलचे अंदाज तंतोतंत खरे ठरतील, अशी अवस्था नाही. म्हणायला अनेकरंगी निवडणूक असली तरी प्रत्यक्षात मात्र भाजप, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष असलेले शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी सामना झडणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची प्रत्येक उक्ती आणि कृती ही प्रचारकी असते. केंद्रातील एकहाती सत्ता आणि परदेश दौ-यात आलेले यश यामुळे त्यांच्या भाषणांना वेगळी धार आली आहे. लोकविश्वास वाढला आहे आणि बारामतीपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व बालेकिल्ल्यांत गर्दीचे वेगळे उच्चांक निर्माण झाले आहेत. ही गर्दी म्हणजेच मतदानाचा कौल असे गृहीत धरले तर भाजप एकहाती सत्ता घेईल, असे चित्र आहे. शब्दाच्या चढ-उताराची नाट्यमयता, प्रचंड जनसमुदायाशी संवाद साधण्याचे कौशल्य आणि देहबोलीचा चपखल उपयोग यामुळे लाखोंच्या सभेतसुद्धा जणू मोदी माझ्याशीच बोलत आहेत असे प्रत्येकाला वाटते. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले की नाही अशा थाटात विचारले जाते की लोक त्यात होकार भरतात आणि महागाई कमी होऊ लागली असे वाटते.

पंधरा वर्षांच्या आघाडी शासनाने खरोखरच इतके काही वाईट केले नाही, कोणती पिढी तर मुळीच बरबाद झाली नाही; पण मोदी यांनी वारंवार सांगून आघाडीने जवळपास महाराष्ट्र रसातळाला नेऊन ठेवला आहे, याच्यावर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे. या तुलनेमध्ये सर्वात पुढे महाराष्ट्र माझा हे सांगण्यात सोनिया गांधींपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सगळ्यांचे आवाज क्षीण ठरतात. निवडणुकांतील मार्केटिंग तंत्रज्ञानाची पुढची पायरी सराईतपणे पंतप्रधानांनी या निवडणुकीत वापरली आहे.

यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला आता वेगळी दिशा मिळाली आहे. राष्ट्रीय पक्षाच्या विरोधात प्रादेशिक पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई करीत आहेत. त्यामुळे एकमेकांचे शत्रू समजले जाणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची भाषा सुरू झाली आहे. अप्रत्यक्षपणे मुंबई-ठाण्याच्या काही जागांवर निवडणुकीअगोदरच तडजोडी होऊन मनसे, शिवसेना एकत्रपणे किमान काही जागा वाढवण्याचा शेवटचा प्रयत्न निश्चित करणार आहेत. एरवी राष्ट्रीय पक्ष म्हणून दिमाखात वावरणा-या राष्ट्रवादीनेसुद्धा आपली प्रादेशिक भूमिका मान्य केली असून हे तीन पक्ष आणि अपक्ष यांची एकत्रित मोट बांधून सत्तेसाठी दावाही केला जाऊ शकतो. सुरुवातीला रा. स्व. संघ लोकसभेप्रमाणे सक्रिय राहणार नाही असे चित्र होते. मात्र संघाचे अ.भा.प्रचारप्रमुख मनमोहनजी वैद्य यांनी नि:संदिग्ध शब्दांत संघ सक्रिय होणार, शतप्रतिशत मतदानासाठी मतदारांना भाजपसाठी प्रवृत्त करणार, असे स्पष्ट केले. त्यामुळे राम जन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जोरकसपणे सुरू आहे.

शिवसेना हिंदुत्वाचा नारा देत असली तरी संघाच्या या भूमिकेने त्यांच्या विचारांशी बांधले गेलेले हजारो मतदार भाजपची मतपेढी वाढवणार आहेत. पण त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये अल्पसंख्य मतांचे ध्रुवीकरण होईल. त्यामुळे औरंगाबाद, नांदेड, मालेगाव अशा ठिकाणी एमआयएमची स्थिती काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे.

रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, शेतकरी कामगार पक्ष आणि डावे पक्ष असे छोटे पक्ष मिळून संभाव्य उमेदवारांचे विशेषत: विदर्भ, कोकण आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र येथे गणित बिघडवू शकतात. पश्चिम महाराष्ट्रात व मराठवाड्यात सहकारी साखर कारखानदारीचे झालेले खासगीकरण, शेतक-यांच्या उसाला कमी दर यामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतक-यांमध्ये मोठा असंतोष आहे. स्वतंत्र विदर्भ निर्मितीवर भारतीय जनता पक्षाची मदार, मुंबई-ठाणे-पुण्यात शिवसेना-मनसेच्या अस्तित्वाची लढाई, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्त्वपरीक्षा आणि पारंपरिक मतपेढीवर काँग्रेसचा विश्वास यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असले तरी कधीकाळी सर्व पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या आणि सध्या कोणत्याच पक्षाचे वर्चस्व नसलेल्या मराठवाड्यातील ४६ जागांचा वाटा नवीन राजकीय समीकरणात निर्णायक ठरणार आहे.