आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या विरोधात \'ब्र\' देखिल काढणार नाही, ही बाळासाहेबांना माझी आदरांजली : नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मतदारसंघात म्हणजे तासगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. विशेषतः शरद पवारांवर मोदींनी हल्ला चढवला. त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अनुपस्थितीतील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात काहीही बोलणार नसल्याचे सांगत मोदींनी आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली.
शिवरायांच्या नावाने त्रिवार जयजयकार. तासगावच्या प्राचीन श्री गणेशाला शतशः नमन. वीरोबाच्या नावानं चांगभलं...सांगली सर्वात चांगली. अशी सुरुवात करत मोदींनी उपस्थितांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.

मोदींच्या भाषणाचा अंश त्यांच्याच शब्दांत....
तासगावच्या प्राचीन श्री गणेशाला शतशः नमन. वीरोबाच्या नावानं चांगभलं...सांगली सर्वात चांगली. आज इथे आमदार आहेत खासदार आहेत आणि त्यांच्यात मी कामदारही आहे. लक्ष्मणराव इनामदार येथून 40 किलोमीटर अंतरावर आहे. माझे जीवन घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचे ऋण उतरवण्याची संधी मला चालून आली म्हणून मी याठिकाणी आलो. लोकसभेत मोठा विजय मिळवून देत तुम्ही संजय काका पाटलांना मोठी विजय मिळवून दिला त्याबाबत आपल्या सर्वांचे आभार. पंतप्रधान पदाची उमेदवारी घोषित झाल्यानंतर भिडे गुरुजींच्या प्रेरणेने मी शिवरायांच्या दर्शनासाठी गेलो. त्यांच्या आशिर्वादाने पंतप्रधानपदाकडे प्रवास सुरू केला.
गुजरात आधी महाराष्ट्राचाच एक भाग होता. आजही आम्ही महाराष्ट्राचे लहान भाऊच आहोत. पण शरद पवारांनी आमच्या नावावर चुकीचा आरोप लावला आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेणा-या शरद पवारांना केवळ खोटे आरोप करता येतात. मुंबई विमानतळ, व्हिक्टोरिया टर्मिनस याला शिवाजी महाराजांचे नाव अटलजींच्या काळात मिळाले. पण तुम्ही मुख्यमंत्री असून तुम्हाला ते सुचले नाही. त्याचे कारण म्हणजे शरद पवारांत शिवाजी महाराजांचे गुण उतरणे शक्य नाही.
शिवरायांनी त्यांच्या काळात सुनियोजित जलव्यवस्थापन केले होते. त्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही काम केले असते, तर महाराष्ट्राच्या शेतक-यांना आत्महत्या कराव्या लागल्या नसत्या. यांनी कारगिलच्या शहीदांच्या विधवांची घरे, बेरोजगारांच्या नोक-या लुटला. सामान्य जनतेचे सुख यांनी लुटले. त्यामुळे त्यांनी आमच्या शिवभक्तीवर शंका घेऊ नये.
बाळासाहेबांना आदरांजली....
इतिहासात शिवरायांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणा-यांना मी सूरतमध्ये त्यांचा सर्वात मोठा पुतळा स्थापन करून उत्तर दिले आहे. मी भाषणात शिवसेनेवर टीका केली नाही, म्हणून माझ्यावर काही वृत्तपत्रांनी माझ्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांनंतरची ही पहिली निवडणूक आहे. बाळासाहेबांप्रती माझ्या मनात मोठा आदर आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांबाबतचा आदर व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या विरोधात ब्र काढणार नसल्याचे मी ठरवले आहे. ही माझी बाळासाहेबांना आदरांजली आहे. राजकारणाच्या पल्याड काही तत्वे असतात. त्याचा राजकारणाशी संबंध नसतो. त्यामुळे मी शिवसेनेच्या विरोधात एक शब्दही बोलणार नाही.
सभेच्या शेवटी स्वच्छतेचे आव्हान
ही शिवरायांची भूमी आहे, या भूमीवर घाण करण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्यामुळे आपण आपला कचरा स्वच्छ करा. जाताना कोणीही याठिकाणी कचरा ठेऊ नका.
निवडणुकांनंतर सुक्ष्मदर्शक घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीला शोधावे लागेल...
तासगाव पाठोपाठ कोल्हापूरच्या सभेतही नरेंद्र मोदींनी आघाड़ीवर हल्लाबोल केला. भारतावर एवढा लक्ष्मीचा वर्षाव व्हावा की, देशाच्या सगळ्या समस्या दूर व्हाव्या, असं साकडं कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या चरणी घालू इच्छितो. शाहू महाराजांप्रमाणे सोशितांसाठी काम करत राहावे यासाठी त्यांचे बळ आम्हाला मिळावे, असे मोदी म्हणाले. मी अमेरिकेत गेलो होतो त्यावेळी मी बातम्या वाचत होतो. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते मी येणार म्हणून टीका करत होते. मोदींना यायची गरज काय अशी टीका करत होते. पण ते असे का करतात याचे कारण मला कळत नव्हते. आज हा विराट जनसमुदाय पाहिल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. माझ्या सभांना होणारी गर्दी पाहून त्यांच्या पोटात गोळा उठत असणार हे माझ्या आज लक्षात आले आहे. लोकसभा निवडणुकीत तरी काँग्रेसला 40 च्या वर जागा मिळाल्या. पण या महाराष्ट्रात निवडणुकांनंतर काँग्रेस राष्ट्रवादीला शोधण्यासाठी सुक्ष्मदर्शक वापरावे लागेल असे मोदी म्हणाले. मार्च 1925 मध्ये गांधीजींनी याच तपोवन मैदानावर चरखा आश्रमाची घोषणा केली होती. पण काँग्रेसवाल्यांना त्यांचे स्वप्नही पूर्ण करता आले नाही. त्यामुळे या लोकांनी गांधीजींचा विचार सोडला.