आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरंडोलमध्ये मोदींचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष हल्ला, \'मी नेत्याच्या घरात जन्माला आलो नाही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( नंदुरबारच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.)
एरंडोल - धुळ्यातील सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एरंडोलमध्ये प्रचारसभा झाली. बाळासाहेबांप्रती असलेल्या आदरामुळे आपण शिवसेनेवर टीका करणार नसल्याचे मोदींनी स्पष्ट केले होते. मात्र, मोदींच्या राज्यात एवढ्या प्रचारसभा कशासाठी या प्रश्नाला प्रत्युत्तर देत मोदींनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर बोलायला सुरुवात केल्याचे जाणवले.
मी राज्यात प्रचार करत असल्याने काही लोकांना भलताच त्रास होत आहे. मोदींना राज्यात एवढ्या सभा घेण्याची गरज काय? असा सवाल काही जण करत आहेत. माझ्या येण्यामुळे सगळ्यांनाच त्रास का होतोय. पण मी नेत्याच्या घरात जन्माला आलेलो नाही, सामान्य जनतेच्या घरात आलो आहे. त्यामुळे मी सामान्य लोकांना भेटण्यासाठी येणारच, असे उत्तर मोदींनी दिले. त्यामुळे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या टीकांना प्रत्युत्तर होते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धुळ्यातील शिंदखेडा येथील दोंडाईचा येथे घेतलेल्या प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. त्याच प्रमाणे भाजप राज्याचे तुकडे करणार, मुंबई राज्याबाहेर पळवणार अशा टीका करणा-यांचाही त्यांनी समाचार घेतला. केंद्रात मी आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. मुंबईशिवाय महाराष्ट्र अधुरे आहे, अशा शब्दांत मोदींनी या मुद्यावर भाजपची भूमिका स्पष्ट केली.

मोदींच्या भाषणाचा अंश त्यांच्याच शब्दांत...
मी लोकसभेत येथे आलो होतो. तुम्ही मला दोन्ही खासदार विजयी करून माझ्या शब्दाचा मान ठेवला. चार महिन्यात मी पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे. प्रचार सभांत काहीही बोलायचे आणि विसरायचे हा नेत्यांचा स्वभाव असतो. पण मी नेता नाही. मी तुमचा सेवक आहे. मी देशाचा प्रधानसेवक आहे. त्यामुळे वचने विसरण्यासाठी नव्हे तर त्यांची आठवण परत करून देण्यासाठी मी आलो आहे. त्यामुळे मी आपल्याला वचन देतो. ज्यावेळी आमचे 60 महिने पूर्ण होतील त्यावेळी प्रत्येक गोष्टीचा हिशेब देईल.


आम्ही खोटे बोलण्यासाठी वचने दिलेली नाही. तर आम्ही विकासासाठी वचने दिली आहेत. विकास करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. धुळे, नंदूरबारला आम्ही मुख्य प्रवाहात आणू. मी लहानपणापासून कांदा खात आलो आहे. त्यामुळे लहानपणापासून आम्हाला कांदा खाऊ घालणा-यांना आम्ही निराश करणार नाही. आम्ही पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर लगेचच राज्य आणि केंद्रातील सरकार मिळून कांदा उत्पादक शेतक-याच्या सर्व समस्या आम्ही दूर करू.


आम्ही काँग्रेसप्रमाणे खोटी आश्वासने देणारे नाही. काँग्रेसने प्रत्येकवेळी रेल्वे लाईन बाबत किती आश्वासने दिली. मनमाड इंदूर लाईनची एवढी जुनी मागणी असूनही केवळ आश्वासने दिली आहेत. साठ वर्षे पंचायतींपासून केंद्रापर्यंत त्यांचेच राज्य होते. त्यांनी कोणतीही वचने पाळली नाही. कामाचा हिशेब दिला नाही. पण आता ते मला हिशेब मागत आहेत. पण त्यांनी देऊ अथवा नाही पण मी तुम्हाला प्रत्येक पैशाचा हिशेब देईल हे माझे वचन आहे.

या निवडणुकीत काँग्रेस नेते खोट्या अफवा पसरत आहेत. त्यांना वाटते रेटून बोलले की ते लोकांना खरे वाटते. पण तुम्ही साठ वर्षे एवढे खोटे बोलले आहात की, लोकांना आता ते पटत नाही. कापूस, कांदा या मुद्यावरून खोट्या अफवा पसवतात. सध्या त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे होणार, मुंबई पळवणार अशा अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. पण जोपर्यंत मी दिल्लीत आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. त्याच प्रमाणे महाराष्ट्र मुंबई शिवाय अधुरे आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या रणधुमाळीतील अशा अफवांवर विश्वास ठेवून नका.
खामगावच्या सभेत सांगितला पाच एफचा फॉर्म्युला
एरंडोल येथील सभेनंतर दुपारी नरेंद्र मोदी यांची बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सभा झाली. राज्याचा विकास होण्यासाठी शेतक-याचा विकास होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मोदी म्हणाले. याक्षेत्रात प्रामुख्याने कापसाची शेती होती. त्यामुळे कापसाची शेती करणा-या शेतक-यांच्या विकासासाठी मोदींनी यावेळी पाच एफचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला म्हणजे फार्म, फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन, फॅशन टू फॉरेन असा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे शेतक-यांचा जो कापूस पिकेल त्याच्यापासून येथेच धागा बनवला जाईल. त्यापासून याठिकाणीच कपडे बनवले जातील. या कपड्यांना येथेच आधुनिकपणाची जोड मिळेल आणि थेट येथून हे कपडे फॉरेनला पाठवले जाऊ शकतील. त्यामुळे या भागातील प्रत्येक शेतक-याबरोबरच इतर अनेकांना रोजगार मिळेल. येथील तरुणांना रोजगारासाठी भटकावे लागणार नाही. हे माझे स्वप्न आहे आणि ते आपल्याच भागात पूर्ण व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
पुढील स्लाइडवर पाहा मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ...