आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाकडे उद्योग जगतासह नाशिककरांचे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशातील एक उत्तम औद्योगिक शहर व स्मार्ट सिटी होऊ शकणाऱ्या नाशिकसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. ५) होणाऱ्या प्रचारसभेत काय देतील, याबाबत उद्योजकांसह नाशिककरांनाही उत्सुकता असून, स्मार्ट शहराच्या स्वप्नासाठी मोदी यांनी नाशिकच्या पंखांत बळ भरावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गुजरात मॉडेलमधील उद्योगांसाठीच्या सुलभ धोरणामुळे महाराष्ट्रातील आणि नाशिकमधीलही अनेक उद्योग गुजरातकडे आकर्षित झाले. या पार्श्वभूमीवर चीनच्या दोन इंडस्ट्रियल क्लस्टरपैकी एक गुजरातमध्ये, तर दुसरे महाराष्ट्रात सुरू होण्याची घोषणा दिलासादायी म्हणावी लागेल. पण, देशाचे कांद्याचे क़ोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये कांद्यावरील निर्यातबंदी, निर्यातमूल्यात केलेली वाढ आणि त्याचवेळी परदेशातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आयात करत स्थानिक कांद्याचे पाडलेले भाव यामुळे नाराजी आहे. दुसरीकडे, उद्योजकांतही असंतोषाचा सूर असून, केंद्राच्या अखत्यारीतील महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातकडे वळवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

मोदींकडून आहेत या अपेक्षा
- नाशिकच्या विकासात अडसर ठरणारी विमानसेवा, विमानतळ पूर्ण होऊनही रखडली आहे. मोदींच्या एका आदेशाने ती सुरू होऊ शकेल.
- सिन्नर तालुक्यात एक हजार एकरावरील सेझ पायाभूत सुविधांसह तयार आहे. तेथे अमेरिकेसारख्या देशाचा इंडस्ट्रियल हब यावा.
- देशातील सर्वात मोठा कृषी पतपुरवठा असलेल्या नाशिक जिल्ह्यात कृषीप्रक्रिया उद्योगाशी संबंधित उद्योगांचा क्लस्टर द्या.
- इलेक्ट्रिकल आणि इलेकट्रोनिक्स हब म्हणून नाशिकला मान्यता मिळाली, आता आयटी हब म्हणूनही मान्यता दिल्यास हजारो रोजगार तयार होतील.
- गंगेच्या धर्तीवरच ‘दक्षिणगंगा’ गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठीही कृती कार्यक्रम द्या.
- द्राक्ष, डाळिंब, कांद्यासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निर्यात खुली करा.
- बोइंग दुरुस्तीसाठी मागील सरकारने नागपूरची निवड केली; पण तेथे पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने होऊ शकली नाही. आता ही कंपनी परदेशात जाण्याऐवजी नाशिकला आणता येऊ शकते.
मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचे निर्णय
- मुंबई शिपिंगवरील मोठ्या प्रमाणावरील उलाढाल मुंद्रा पोर्टकडे वळविण्यात आली. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यावर झाली.
- २६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पालघर येथे मरीन पोलिस ट्रेनिंग सेंटरला मान्यता दिली होती. त्यासाठी राज्य शासनाने जमीनही उपलब्ध करून दिली. हा प्रकल्प द्वारकेस नेण्यात आला.
- भारतीय रिझर्व्ह बँकेची एनआरआय अकाउंट आणि नॉन मूव्हेबल प्रॉपर्टी, विदेश चलन विनिमय अशी तीन कार्यालये दिल्लीस नेली.
- भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या देशातील सर्वच प्रेस तोट्यात असताना नाशिकचाच कारखाना बंद करण्याच्या हालचाली.
- मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना सुरतमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक वेळा निमंत्रण. हा उद्योग गुजरातमध्ये न्यायचा घाट.
- ऑगस्टमध्येच ५० हजार टन कांदा आयात करण्याची सरकारकडून लोकसभेत घोषणा; त्याचा फटका जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बसला.