आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपादकांच्या नजरेतून - यंदाही, नाशिकचा रंग दिसणार वेगळा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंग माझा वेगळा... अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील राजकारणाचा बाज नेहमीच गुंगवून टाकणारा राहिला आहे. येत्या निवडणुकीतही महायुती आणि आघाडी टिकते की भंगते यावर येथील गणित अवलंबून असेल. युती अभंग राहिली तर जिल्ह्यात युतीला १५ पैकी १० ते १२ जागा मिळण्याची चिन्हे आहेत आणि युती तुटली तर मात्र आपसांतील टकरीत शिवसेना-भाजप घायाळ होतील. ग्रामीण भागात शिवसेनेचा पाया पक्का असल्याने भाजपच्या साथीशिवायही शिवसेना तीन ते चार जागा मिळवू शकते. मात्र, भाजपला एखाद-दुसरी जागा मिळवणेही मुश्किल जाईल.
एकेकाळी पंजावाला काँग्रेस, कधी काळी फक्त शरदराव पवार, बिल्लाधारी शेतकरी संघटना, मध्यंतरीच्या काळात शिवसेना-भाजप युती तर अगदी अलीकडे राज ठाकरे यांची मनसे तसेच ओबीसींचे मसिहा छगन भुजबळ यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस यांची हवा कालानुरूप जिल्ह्याच्या राजकीय पटलावर घोंगावत आली अन् ज्या गतीने ती आली त्याच गतीने कालौघात विरून गेली. त्यामुळेच कदाचित जिल्ह्याचे राजकारण कधीही एकाच पक्षाच्या दावणीला बांधल्यागत राहू शकलेले नाही. जातीपातीच्या राजकारणाला फाटा देत विकास हाच कणखर मुद्दा घेऊन लढणारे भुजबळ असो की राज यांची लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी कशी धूळधाण उडवून दिली हेच ज्वलंत उदाहरण नाशिकच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करण्यास पुरेसे ठरू शकेल.

तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकला स्थानमाहात्म्य आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ नेते शरदराव पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी सत्तेची कवाडे उघडी करणारी सत्तापावनभूमी म्हणूनही जिल्ह्याची ओळख आहे. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत १४ पैकी १४ जागा या जिल्ह्याने शरदरावांच्या पारड्यात टाकल्या होत्या. तेव्हा पुलोदचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी १९९५ च्या निवडणुकीचे रणशिंग याच भूमितून फुंकताना ‘दार उघड बये, दार उघड...’ असे साकडे साक्षात आई जगदंबेला घातले होते. पाठोपाठ युतीचे सरकार अवतरले. तेव्हाच कधी नव्हे ते नाशिकच्या पदरात तब्बल चार मंत्रिपदे पडली. एवढेच काय जनता दल (धर्मनिरपेक्ष) हा कुचेष्टेचा विषय ठरला होता त्याचाही देशातील एकमेव खासदार हरिभाऊ महाले यांच्या रूपाने याच जिल्ह्याने दिला. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अन् म्हणून लाल दिवा प्राप्त केलेले शेतकरी संघटनेचे पंचप्राण शरद जोशी यांनाही काही काळ बरे यायलाही नाशिकच कारणीभूत ठरले होते. त्यामुळे या जिल्ह्याने जसे अनेक दिग्गजांना सुगीचे दिवस दाखविले त्यांच्यापैकी काही पक्ष संघटनांच्या वाटेला वाईट दिवसही आले. उदाहरणार्थ, शिवसेनेतील भुजबळांचे बंड असो की शिवसेना सोडल्यानंतर राज यांनी गोदावरी किनारी ठोकलेला मुक्काम, दोहोंनाही याच तीर्थक्षेत्राचा आसरा होता. पूर्वश्रमीचे शिवसैनिक नारायण राणेंच्या बंडाला साद देणारे दोन आमदार हेही नाशिकचेच होते. आता आताच, सर्वोच्च न्यायालयाच्या दोषी लोकप्रतिनिधींना शिक्षेमुळे निवडणुकीपासून चार हात लांब ठेवण्याच्या निर्णयाचाही पहिला झटका बसला तोही नाशिकचे शिवसैनिक आमदार बबन घोलपांना.

या एकूण बहुढंगी वा बहुरंगी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नाशिक जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघ आहे. त्यापैकी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण आणि दिंडोरीसह अर्धाधिक नाशिक तालुकाही आदिवासीबहुल आहे. नाशिक तालुक्यामध्ये चार मतदारसंघ असून त्यातील नाशिकरोड-देवळाली ‘एससी’साठी राखीव आहे. त्यावर गेल्या दोन दशकांपासून वादग्रस्त माजी समाजकल्याण मंत्री बबन घोलप यांचा वरचष्मा आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने बबनरावांसह त्यांच्या पत्नीला तीन वर्षे शिक्षा ठोठावली. न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुकीपासून चार हात लांब राहण्याची वेळ येणारे घोलप हे मराठी प्रांतातीलच नव्हे तर देशपातळीवरील पहिले आमदार ठरले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे नावाच्या गारुडाने नाशिक पश्चिम, मध्य पूर्व अशा तीन मतदारसंघांवर अधिराज्य गाजविले. परिणामी या तीनही ठिकाणांहून मनसेचे वसंत गिते, नितीन भोसले अँड उत्तमराव ढिकले निवडून आले होते. तीन आमदार ४० नगरसेवक पर्यायाने महापालिकेच्या चाव्या कमरेला लटकविण्याची संधी मनसेला आपसूकच चालून आली होती.
याव्यतिरिक्त सिन्नर, इगतपुरी, नांदगाव येवला हे चारही मतदारसंघ भारदस्त आहेत. उद्योगमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक माणिकराव कोकाटे यांनी गेल्याच निवडणुकीत सिन्नरमधून हॅटट्रिक केली. पण त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भुजबळांना आव्हान दिल्यापासून भुजबळ विरुद्ध कोकाटे सामना रंगू लागला आहे. त्याचा परिणाम नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. भुजबळांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कोकाटे समर्थक उमेदवारांना चारी मुंड्या चीत करीत घोडा मैदान अभी दूर नही.. असा इशारा देऊन टाकला. असेच काहीसे चित्र इगतपुरी संघातही आहे. इंदिरामायच्या छत्रछायेखाली जवळपास चार दशकं खासदार राहिलेल्या माजी मंत्री माणिक होडल्या गावित यांची कन्या निर्मलाताई इगतपुरीचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्यांनीही गेल्या निवडणुकीत भुजबळांशी पंगा घेतल्यामुळे तेथेही संघर्षाची ठिणगी पडली आहे. येवल्यात खुद्द गब्बर अर्थात भुजबळ अन् शेजारच्या नांदगावमध्ये पुत्र पंकज दोन्ही मतदारसंघ सांभाळून आहेत.
मंत्रिमडळातील वजन अन् राजकारणातील प्रभावी शब्द याच्या जोरावर भुजबळांनी येवला मतदारसंघासह अवघ्या जिल्ह्यामध्ये विकासाची कामे उभी केली. येवल्याचा तर प्रचंड कायापालट केला. नांदगावमध्येही आजवर झालेली असंख्य कामे दशकभरात करून टाकली. ज्या येवल्यामध्ये बाराही महिने पाण्याचे टँकर्स चालायचे त्याच टँकर्सचे प्रमाण शून्यावर यावे इतपत तेथील पाण्याचा दुष्काळ दूर करण्यात त्यांना यश आले आहे.

कळवण मतदारसंघ हा सध्या तरी एकमेव अपवाद ठरू शकेल असा आहे. तेथे माजी मंत्री विद्यमान राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार अर्जुन तुळशीराम अर्थात ए. टी. पवार यांचेच वर्चस्व राहिले आहे. सलग आठ वेळा त्यांनी हा मतदारसंघ ताब्यात ठेवला असला तरी या प्रदीर्घ कालावधीत काँग्रेस, भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अशा सोयीसोयीने कोलांटउड्याही मारल्या आहेत. पक्ष वा नेता कोणताही असो ए. टी. यांनी कळवण या आदिवासीबहुल तालुक्यात रस्त्यांचे जाळे भक्कम अन् शेती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावल्यामुळे हा तालुका सुजलाम् सुफलाम् झाला आहे. सुरगाणा हा माकपचा बालेकिल्ला मतदारसंघाच्या विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीने काबीज केला. सलग सहा वेळा निवडून येणारे जिवा पांडू गावित यांचे संस्थान या निमित्ताने खालसा झाले. मालेगाव मध्य मालेगाव बाह्य, चांदवड-देवळा, बागलाण, दिंडोरी-पेठ, निफाड या मतदारसंघांमध्येही गेल्या वेळप्रमाणेच यंदाही चित्र राहील, असे दिसते. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे भरभक्कम जाळे आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी बँका, सोसायट्या असो की गावच्या पारावरील राजकारण यामध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा असून त्या पाठोपाठ शिवसेना, काँग्रेस यांचाही बऱ्यापैकी प्रभाव आहे. भाजपची अवस्था मात्र जेमतेम आहे. त्यांचे केवळ चार सदस्य जिल्हा परिषदेत आहेत. पण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या १५ मतदारसंघातून महायुतीच्या अडीच खासदारांना ज्या पद्धतीने मताधिक्य मिळाले तसेच ‘विकास पुरुष’ छगन भुजबळांना मतदारांनी ज्या रीतीने जोरदार धक्का दिला तो पाहता नाशिकची हवा नेमकी आता कोणत्या दिशेने वाहते आहे हे राजकीय वारे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.