आपल्या देशातील बहुतांश राजकारण्यांची मुले परंपरेनुसार राजकारणाचा वारसा चालवत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी आपापल्या वारसांना पुढे करत विधानसभेत पाठवण्याची तयारी केली आहे. यातील काही तरुण व नवख्या उमेदवारांचा परिचय...
विमल मुंदडांच्या स्नुषा शर्यतीत
बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघ अजूनही दिवंगत माजी मंत्री विमल मुंदडा यांचा गड म्हणून ओळखला जातो. त्यांनी १५ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ‘ओन्ली विमल’ ही घोषणा याच मतदारसंघाने राज्यभर लोकप्रिय केली. मात्र २२ मार्च २०१२ रोजी विमलताईंचे आजारपणामुळे निधन झाले. नंतरच्या पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहिला असला तरी तो मुंदडा कुटुंबीयांकडे नव्हता. आता विमलताईंच्या स्नुषा व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अक्षय मुंदडा यांच्या पत्नी आर्किटेक्ट नमिता लोखंडे -मुंदडा या विमलताईंचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.
माहेरी कोणताही राजकीय वारसा नसताना सासूच्या ‘पुण्याई’वर वयाच्या २५ व्या वर्षी आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पती अक्षय मुंदडा व सासरे नंदकिशोर मुंदडा यांचे भक्कम पाठबळ व जनसंपर्काच्या जोरावर त्या विजयाचा दावा करतात. नमिता यांचे मूळ गाव सांगली. मात्र वडील अशोक लोखंडे विमान प्राधिकरणात नोकरीस असल्यामुळे त्यांचे वास्तव्य लग्नापूर्वी मुंबईतच होते. वर्षभरापूर्वी अक्षयशी
विवाह झाल्यानंतर आता त्या राजकारणाचे धडे गिरवू लागल्या आहेत.
शब्दांकन : मुकुंद कुलकर्णी, बीड
पुढे वाचा... तटकरेंचा पुतण्याविषयी...