आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच पक्ष स्वतंत्र झाल्याने राजकारणातून 'जात' निघेल; प्रकाश आंबेडकर यांना विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - 'राज्यात शिवसेना-भाजप युती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत राजकीय 'घटस्फोट' झाल्याने आता लोकशाही व्यवस्था बळकट होईल. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात जातीच्या आधारावर सुरू असलेले राजकारण संपुष्टात येईल, तसेच समाजातील लहानात लहान घटकांचे मतदान आता महत्त्वाचे ठरेल,' असा विश्वास भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केला.
एकापेक्षा अधिक पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर मतदाराला अधकि महत्त्व येईल. लहान लहान समाजातील लोकांची मते विचारात घेतली जातील ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येतील, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावास भाजपचा नकार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या चौकशीसाठी दिलेली परवानगी या दोन घटना राज्यातील युती आणि आघाडी तुटण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस युती - आघाडीतील मित्रपक्षांत सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेच्या फैरी या केवळ देखावाच होत्या, असेही आंबेडकरांनी सांगितले.
शिवसेनेने स्वत:चे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी राज्यात अस्तित्वाची लढाई सुरू केली आहे. त्यासाठी या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळवणे महत्त्वाचे वाटत होते. याच कारणावरून जास्त जागांचा आग्रह कायम ठेवत शिवसेना नेत्यांनी गेल्या २५ वर्षांपासून भाजपसोबत असलेली युती तोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तशीच परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची झाली होती. म्हणूनच आज राज्यात बहुतांश पक्ष स्वबळावर लढत असल्याचे चित्र आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या दृष्टीने विदर्भवाद्याने भाजपला धक्का देण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.
'मॅरेज' नव्हे, 'फ्लर्ट'
निवडणूकपूर्व किंवा नंतर काँग्रेस शिवसेना यांच्यात युती होण्याची कुठलीही शक्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे खुलेआम भाजपसोबत जातील, असे मला आता तरी वाटत नाही. पण राजकारणात कुठलीही शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांची राजकीय कारकीर्द पाहता ते तसे करणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर नेमके किती आमदार कोणाला मिळतील, यावर सर्व गणित निश्चित होईल. तूर्तास प्रेमातील 'फ्लर्ट' राजकारणात पाहावयास मिळेल, ते 'मॅरेज' राहणार नाही, असा युक्तिवादही अॅड. आंबेडकरांनी केला.