आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Comment On Uddhav Thackeray's Politics By Prashant Dixit

भाष्‍य: ठाकरे नतमस्तक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या सभेत उद्धव ठाकरे शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. उद्धव ठाकरे हे आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे कधीही अनुकरण करीत नव्हते. किंबहुना तेच त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते; परंतु अलीकडे त्यांनी बाळासाहेब व काही प्रमाणात नरेंद्र मोदी यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. तसे मोदींचे अनुकरण बरेच जण करतात. प्रत्येक जण लोकांना प्रश्न करीत भाषण करू लागला आहे. उद्धव ठाकरे आज तसेच करीत होते. काही वर्षांपूर्वी ठाण्याच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांना दंडवत घातले होते. त्याचा बराच गाजावाजा झाला होता. नंतर असेच दंडवत शिवाजी पार्कवरही घातले गेले.
बाळासाहेबांच्या या कृतीने शिवसैनिक भारावून गेले होते. मात्र, सत्ता काही मिळाली नव्हती. आज उद्धव ठाकरे यांनी अतिशय भावनाप्रधान भाषण केले. सत्तेचा घास हिरावला जात असल्याची कळ त्यांच्या वाक्यावाक्यात जाणवत होती. आजही त्यांच्या टीकेचे लक्ष्य भाजप हेच होते. लोकांना ही टीका कितपत आवडत आहे याची शंकाही होती व म्हणून भाजप लक्ष्य का, याची कारणे ते वारंवार देत होते. दुस-या बाजूला राज ठाकरेही अशीच कारणे देत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादीचा ते उल्लेख करतात व नंतर मोदींवर येतात. शरद पवार असो वा राहुल गांधी, सध्या फक्त भाजपविरोधात अन्य सर्व असा सामना सुरू आहे. याचा फायदा मोदींनाच होतो हे या नेत्यांच्या लक्षात येते की नाही, ते कळत नाही. युती तुटल्यापासून उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार झुंज दिली आहे यात शंकाच नाही. उद्धव ठाकरेंकडून अशी तिखट टक्कर अपेक्षित नव्हती व याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. युती तुटताच शिवसेनेने आक्रमक प्रचार सुरू केला. मराठी-अमराठी वादाला फोडणी दिली.
सोशल नेटवर्कचा खूप हुशारीने उपयोग करून घेतला. लोकांना खिळवून ठेवणा-या व मराठी माणसाची नस नेमकी पकडणा-या जाहिराती दाखवल्या. शिवसेनेच्या धनुष्यबाणासमोर कमळाची वाताहत होणार, असे चित्र होते. मात्र, मोदींचा झंझावात सुरू झाला व लोकांमध्ये मोदी फॅक्टर अद्याप जिवंत असल्याचे ठिकठिकाणी जाणवू लागले. अमेरिकेतील यश त्यांच्या पाठीशी होते. याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी अफझल खानाच्या फौजेची भाषा केली. ती लोकांना तितकीशी पसंत पडली नाही. आजही फार मोठा धमाका करणार, अशी जाहिरातबाजी उद्धव ठाकरे यांनी केली. पण तसे काहीच झाले नाही. आजही त्यांचा सूर जखमी खेळाडूसारखा होता. शिवरायांचा इतिहास व मावळ्यांची फौज या पलीकडे त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नव्हते. झुकणार नाही, वाकणार नाही अशी मराठमोळी भाषा त्यांनी केली. पण मराठी तरुण आता बदलत चालला आहे, हे त्यांच्या लक्षात आले नसावे. ही भाषा पसंत पडणारे लोक खूप आहेत हे खरे, पण सत्ता मिळवून देण्याइतकी त्यांची संख्या आहे काय, याबद्दल शंका आहे.
उद्धव ठाकरे खूप भावुक झालेले दिसत होते. पण लोकांना आज स्ट्रॅटेजी हवी होती. आत्मविश्वास हवा होता. तो काही दिसला नाही. युती तोडण्याचा निर्णय मंजूर आहे की नाही ते सांगा, हा सवाल आता करण्यात काय अर्थ होता, हे लोकांना कळले नाही. युती तोडण्याचा निर्णय बरोबर आहे की नाही याची खात्री उद्धव ठाकरे यांना अद्याप पटली नसल्याचे यातून दिसले. सत्ता येणारच असे ते पुन्हा पुन्हा सांगत होते. सत्ता येणारच असेल, तर युती तोडण्याचा निर्णय बरोबर की चूक हे विचारण्याला काही अर्थ राहत नाही. लोकांना भव्य घोषणा, अफलातून कार्यक्रम असले काही नको आहे. नेत्यामध्ये ते आत्मविश्वास पाहत असतात. मोदींमध्ये तो लोकसभेत दिसला. विधानसभेत त्याचा प्रभाव तितका राहिलेला नाही हे सत्य आहे. शिवसेनेने अनेक ठिकाणी भाजपच्या आत्मविश्वासाला खिंडार पाडले. यामुळेच सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचे नाव येत असले, तरी बहुमत बरेच दूर आहे; परंतु एकाच पक्षाच्या हाती सत्ता द्या, आघाड्या नकोत हा मोदींचा आग्रह अधिकाधिक लोकांना पटू लागला आहे, हेही नाकारता येत नाही. हा आग्रह लोकांना प्रॅक्टिकल वाटतो. शिवसेनेकडे भावनेची शक्ती आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, पण लोकांना आज प्रॅक्टिकल गोष्टी आकर्षित करतात. इथे मोदी अन्य सर्व नेत्यांवर मात करतात.