आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratik Patil Ask Hicommand To Break Alliance With Ncp

राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच, प्रतिक पाटील यांनी हायकमांडकडे मांडली भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे भिजत घोंगडे असतानाच यावेळी कॉँग्रेसने स्वबळावर लढावे अशी भूमिका माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि कॉँग्रेसचे नेते प्रतिक पाटील यांनी घेतली. कॉँग्रेस देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यभर पक्षाचे सक्षम जाळे दिसून यावे अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचे त्यांनी दिव्य मराठीसोबत बोलताना सांगितले.
प्रतिक पाटील म्हणाले, गेली पंधरा वर्षे आम्ही राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आहोत परंतु त्यांच्याकडून आम्हाला आलेले अनुभव अत्यंत वाईट आहेत. कॉँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे राज्यभरात कॉँग्रेसचे अस्तित्व दिसायला हवे. कॉँग्रेसमध्ये नव्या पिढीला संधी मिळत नाही त्याला कारण राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आहे. कॉँग्रेस स्वबळावर लढल्यास प्रत्येक मतदार संघातून कॉँग्रेसचा उमेदवार उभा राहिल. काही मतदार संघातून नव्या उमेदवारांचा पराभव झाला तरी तो कॉँग्रेसचा नेता म्हणून नावारूपास येईल, याच पद्धतीने कॉँग्रेसच्या नेत्यांची एक नवी फळी तयार होणार आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी झाली तरी ते कॉँग्रेस उमेदवारच्या विरोधात आपला प्रतिनिधी उभा करतात हाच अनुभव त्यांच्याकडून आतापर्यंत आला आहे. कॉँग्रेसचे उमेदवार कसे पडतील याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होतो. प्रचाराच्या वेळी कॉँग्रेसचा ज्येष्ठ नेताही त्यांच्या मतदारसंघापुरताच उरतो, त्यामुळे अनेक नवख्या उमेदवारांकडे दुर्लक्ष होते. यात सुधारणा होणे गरजेचे आहे. पक्षाने यासाठी रणनिती आखायला पाहिजे. पण आघाडी झाली तर पुन्हा जुनेच कटू अनुभव येतील. राज्यात गेल्या 50 वर्षात पाहिजे त्या प्रमाणात कॉँग्रेसमध्ये नेते तयार होऊ शकले नसल्याची खंतही प्रतिक पाटील यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीला कॉँग्रेसबाबत जराही आस्था नाही. असे असते तर कोल्हापुरात संयुक्त शुभारंभ झाला असता. केवळ स्वत:चे मार्केटिंग करायचे आणि आघाडीची भाषा करायची ही नैतिकता नाही.
लोकसभेत अनुभवायला आलेली मोदींची हवा कुठल्या मार्गाने निघाली हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. पोटनिवडणुकीत ते स्पष्ट झाले. कालच्या निकालाने भाजपही शुद्धीवर आले आहे. विधानसभेत मोदीची जराही लाट दिसणार नाही. लोकसभेत मात्र होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान झाले. ज्या तरुणांना पहिल्यांदा मतदानाची संधी मिळाली त्यांनी मोदींना निवडले होते परंतु आपली चूक झाली हे लवकरच त्यांच्या ध्यानात आले. 2009 मध्ये मला लोकसभेत 3 लाख 77 हजार मते पडली होती. 2014 मध्ये माझे केवळ 5 हजार मते कमी झालेत. त्यामुळे कॉँग्रेसचे मते घटली असे म्हणता येणार नाही परंतु प्रतिस्पर्धी 2 लाख 40 हजार मतांनी निवडूण आलेत. हे वाढीव मतदान लहरीचे होते. ती आता ओसरली आहे. त्यामुळे विधानसभेत लोकसभेसारखे चित्र राहणार नाही आणि राज्यात पुन्हा कॉँग्रेसची सत्ता येईल.