औसा (लातूर) / महाड (रायगड) - चीनी सैनिक लडाखमध्ये घुसखोरी करत होते, तेव्हा देशाचे पंतप्रधान चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झोपाळ्यावर झुलत होते, देशाच्या इतिहासात प्रथमच असे चित्र पाहायला मिळाले, असा प्रहार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारात आमची सत्ता आली तर चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवू अशी भाषा करणारे मोदी आता का शांत आहेत, असा सवाल त्यांनी केला. भाजप आणि शिवसेनेवर टीका करत राहुल गांधी यांनी काँग्रेसला बहुमत द्या, असे आवाहन कोकणात महाड आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथील जाहीर सभेत केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराला राहुल गांधी यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून सुरवात केली. त्यानंतर ते काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरमध्ये आले. महाडमध्ये काँग्रेस उमेदवार माणिक जगताप यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीला आठ दिवस उरले असताना काँग्रेस उपाध्यक्षांनी प्रचाराला सुरवात केली. राज्यातील प्रचाराचा हा त्यांचा पहिला दिवस होता.
राज्यात सर्वच पक्षांचे नेते रणधुमाळीत उतरले असताना काँग्रेसच्या युवराजांचे आगमन काहीसे उशिराने झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्रातील सत्ता टीकवून ठेवणे हे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. त्यात त्यांचा सहकारी पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेसनेही ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची साथ सोडल्याने काँग्रेससाठी ही लढाई अधिकच अवघड झाली आहे.
राहुल गांधी यांच्या भाषणाचा रोख मोदी सरकारवर टीका आणि यूपीएच्या काळात केलेल्या कामाची उजळणी असा होता. केंद्रातील भाजप सरकार गरीबांच्या विरोधात असल्याचे राहुल म्हणाले. भाजप सरकारने कँसर, ह्लदयरोग, मधुमेह यासारख्या आजारांवरील औषधी महाग केली असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे श्रीमंतांना काही फरक पडणार नाही, मात्र देशातील सर्वसामान्य नागरिकाचे आरोग्य धोक्यात येणार आहे. काँग्रेसच्या काळात मोफत औषधांची योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींनी शेतकरी-सामान्यांच्या कष्टाला नाकारले
भाजप सत्तेच्या जोरावर गोरगरीबांच्या हिताचे कायदे बंद खोलीत बदलत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. देश स्वतंत्र झाल्यापासून कोणतीच विकासाची कामे झाली नाही, असा प्रचार भाजप करत आहे. व्यक्ती केंद्रीत राजकारण भाजप करत असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले, 'त्यांचे (भाजप नेत्यांचे) म्हणणे आहे की फक्त एक माणूस देश घडवत आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लाभभाई पटेल यांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तुमच्या माझ्या आणि आमच्या माता-पित्यांच्या कर्तृत्वावर प्रश्न चिन्ह लावत आहेत.' सर्वकाही यांनीच केले का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांच्या प्रचार सभेची छायाचित्रे....पुढील स्लाईडवर...