आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Engine Supports Sathe News In Divya Marathi

साठे यांना रेल्वे इंजिनाची साथ, घाटणेकरांची नाट्यमय माघार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी - माढा मतदार संघात पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता १३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार संजय पाटील-घाटणेकर व मनसेचे जिल्हा प्रमुख प्रशांत ऊर्फ दिनेश गिड्डे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर अपक्ष दादासाहेब साठे यांनी मनसेत प्रवेश करून मनसे पुरस्कृत उमेदवार म्हणून मैदानात आहेत. यामुळे माढा मतदार संघात चौरंगी लढत होणार आहे.
विद्यमान आमदार बबनराव शिंदे (राष्ट्रवादी), शिवाजी सावंत (शिवसेना), कल्याणराव काळे (काँग्रेस), गणपतराव ऊर्फ दादासाहेब साठे (अपक्ष, मनसे पुरस्कृत) या उमेदवारांत प्रमुख लढती होणार आहेत.या निवडणुकीत महायुती व आघाडी तुटल्याने मित्र पक्ष समोरासमोर आहेत. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे दादासाहेब साठे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. मोडनिंबचे मनसेचे उमेदवार प्रशांत गिड्डे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन साठे यांना पुरस्कृत केले आहे. तर काँग्रेस पक्षातून कल्याणराव काळे यांना उमेदवारी दिली असली तरीही साठे यांच्यामुळे मतांचे विभाजन होणार आहे. स्वाभिमानीचे संजय घाटणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सावंत किंवा साठे या दोघांपैकी एकाला नक्कीच फायदा होणार आहे. परंतु घाटणेकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.माढा मतदार संघात चौरंगी लढत होत असली तरी मित्र पक्षांचा फटका एकमेकांना बसणार आहे. राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे यांनी माढा येथे केलेल्या विकासकामांमुळे ते सर्वांना वरचढ ठरणार आहेत. तर गावोगावी शिवसेना पोहचली असल्याने सेना उमेदवाराला फायदा होऊ शकतो.
माढा मतदार संघात माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांचा समावेश आहे. या गावांच्या जोरावर काँग्रेसचे काळे रिंगणात उतरले आहेत. परंतु माढा तालुक्यातील सुरूवातीला त्यांचा परिचय नसल्याने व तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे यांचे पुत्र दादासाहेब साठे हे अपक्ष मनसे पुरस्कृत झाले असल्याने यांच्या मताचा परिणाम काळे यांच्यावर होण्याची शक्यता आहे. माढा पूर्व भागातून अपक्ष साठे व शिवसेनेचे सावंत यांना उमेदवारी असल्याने या पूर्व भागातील मतांचे विभाजन होणार आहे. त्याचा फायदा बबनराव शिदे यांना होणार आहे. बसप, अपक्ष उमेदवार मैदानात उतरले असल्याने ते त्यांच्या वर्चस्व असलेल्या गावांमध्ये प्रमुख पक्षांची मते खाण्याची शक्यता आहे.
यांनी घेतली माघार
प्रशांत गिड्डे (मनसे), संजय पाटील घाटणेकर (स्वाभिमानी शेतकरी संघटना), नरेंद्र भोसले (अपक्ष), राजकुमार पाटील (अपक्ष), शशिकांत पाटील (अपक्ष) हे आहेत रिंगणात

बबनराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ), शिवाजी सावंत (शिवसेना, धनुष्यबाण), कल्याणराव काळे (काँग्रेस, हात), गणपतराव ऊर्फ दादासाहेब साठे (मनसे पुरस्कृत अपक्ष, कपाट), श्रीकृष्ण प्रक्षाळे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), भारत बोबडे (बहुजन विकास आघाडी, शिटी), रणजित चव्हाण (हिंदुस्थान प्रजा पक्ष, ब्रीफकेस), दादासाहेब कळसाई (अपक्ष, करवत), गणेश सरडे (अपक्ष, बॅटरी), मोहन ढवळे (अपक्ष, कपबशी), मोहन गायकवाड (अपक्ष, नारळ), रणजितसिंह कदम (अपक्ष, काठी), संजय हक्केपाटील (अपक्ष, अंगठी).

घाटणेकर संपर्क क्षेत्राबाहेर
घाटणेकर यांच्याशी यासंबंधी विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असताना त्यांनी आपला मोबाइल बंद ठेवला होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.