आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान भाजपच्या प्रचारासाठी शासकीय यंत्रणा राबवतात, राज यांचे मोदींवर टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही गुजरातमध्येच अडकून पडले आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत याचाच त्यांना विसर पडला आहे. महाराष्ट्रात येऊन ते राज्याला गुजरातपेक्षा पुढे नेणार असे आश्वासन देतात. देशाच्या पंतप्रधानांना गुजरात काय आणि पश्चिम बंगाल काय, त्यांना सर्व राज्य समान असले पाहिजे. मात्र नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे वागत असल्याचा घाणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत केला. मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युती तुटल्याचे जनतले दाखवत असले तरी या चारही पक्षांचे आधीच सर्व ठरलेले होते. ते फक्त जनतेला उल्लू बनवत आहेत. यांची सर्व सेटींग झालेली असते, असा आरोप त्यांनी चारही पक्षांवर केला. लोकसभा निवडणूकीतच शरद पवार एनडीएमध्ये येणार होते, मात्र आरएसएसचा विरोध असल्यामुळे तो मुहूर्त टळल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसला आतापर्यंत संधी दिली एकदा राज ठाकरेला आजमावून पाहा, असे म्हणत त्यांनी मनसे उमेदवारांना विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले.
राज्यातील विरोधी पक्षाचे नेत्यांचे सत्ताधार्‍यांसोबत सेटलमेंट असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानभवनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये भाजपनेते सेटलमेंट करत होते, असा आरोप राज यांनी केला. माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा संपूर्ण आराखडा तयार आहे, एकदा संधी देऊन पाहा पहिल्या दिवसापासून कामाला सुरवात करतो असा दावा त्यांनी केला.
नाशिक महापालिका मनसेच्या ताब्यात आहे, पण तिथे पालिकेला आयुक्तच दिला नाही, काम कसे करणार असा सवाल त्यांनी केला. पाच वर्षानंतर जाऊन पाहा, नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला असेल, असेही ते म्हणाले.
मोदी सरकारी यंत्रणा राबवत आहेत
निवडणूक आयोग आम्हाला पक्षाचा आणि उमेदवाराचा खर्च किती केला याचा हिशेब विचारणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची यंत्रणा प्रचारासाठी वापरत आहेत, त्यांना जाब कोण विचारणार? असा सवाल त्यांनी केला. मोदींच्या महाराष्ट्रातील सभेसाठी गुजरातचे पोलिस बंदोबस्तासाठी येतात असा गोप्यस्फोट करुन राज ठाकरे म्हणाले, यांचा आमच्या पोलिसांवरही विश्वास नाही.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल मुंबईत येऊन येथील उद्योजकांना त्यांच्या राज्यात येण्याचे आवाहन करतात. त्यांना पंतप्रधानांनी खडसावले पाहिजे होते. पण मोदी अजूनही पंतप्रधान झाले नाही, ते गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत.
राज्य सरकारकडे योजनाच नाही
राज्यातील शहरे ही बॉम्ब पडल्यासारखी दिसत आहेत. कोणत्याच शहराचा नियोजनपूर्वक विकास झालेला नाही. शहरांना रस्ते नाही, रस्त्यांवर पार्किंगची सोय नाही. मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही, बागडण्यासाठी बाग नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. तरीही आम्ही पुन्हा पुन्हा त्याच लोकांना निवडून देत असल्याबद्दल राज ठाकरे यांन संतपा व्यक्त केला. जोपर्यंत मतदारांना राग येणार नाही, चिड येणार नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही, असेही ते म्हणाले.