मुंबई - मुंबईत प्रचाराचा नारळ वाढवल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पहिल्या टप्प्यातील प्रचार सभा मंगळवारी दर्यापूर (जि. अमरावती) येथे होणार आहे, तर बुधवारी रात्री आठ वाजता त्यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. मुंबईतील सभा झाल्यानंतर राज यांच्या राज्यातील सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या सभांचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता दर्यापूर (जि. अमरावती) येथे राज यांची सभा होणार आहे. दुपारी तीन वाजता वलगाव (जि. अमरावती) येथे ते मेळाव्याला संबोधित करतील. बुधवारी सकाळी ११ वाजता वणी (जि. यवतमाळ), दुपारी दोन वाजता हिंगणघाट (जि. अमरावती), तर रात्री वाजता औरंगाबाद येथे त्यांची जाहीर सभा होईल. गुरुवारी सकाळी ११ वाजता शेगाव येथील सभेला राज संबोधित करतील. दुपारी दोन वाजता पाचोरा (जि. जळगाव) येथे जाहीर सभा होईल. सायंकाळी सहा वाजता सिल्लोड येथे सभा होईल.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता पैठण येथे ते सभा घेतील. दुपारी तीन वाजता घनसावंगी (जि. जालना), तर सायंकाळी सहा वाजता पाथरी येथे राज यांची जंगी सभा होईल. पहिल्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अकरा वाजता निलंगा येथे ते सभेला संबोधित करतील. दुपारी तीन वाजता लोह्याचे उमेदवार रोहिदास चव्हाण यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा होईल. सायंकाळी सहा वाजता हिंगोली गेट नांदेड येथे दिलीप ठाकूर प्रकाश मारावार यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा होईल.