मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार किंवा नाही? या प्रश्नाचे उत्तर राज ठाकरे यांनी एका वाहिनीला दिलेल्या कार्यक्रमात दिले आहे. युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी राज यांचे फोनवर बोलणे झाले होते. त्या दोघांमध्ये रणनीतीही ठरली. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून नंतर प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे अखरे उशीर झाला असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंचे शब्द जसेच्या तसे...
''युती तुटली त्याच दिवशी सामानाचे बाजीराव दांगट मला भेटण्यासाठी आले. उद्धव ठाकरे व मी एकत्र यावे असे त्यांनी सुचवले. त्यावर पण काय करायला पाहिजे अशी मी विचारणा केली. त्यासंदर्भात आमची चर्चा झाली. त्यानंतर दांगट तिथून गेल्यानंतर मला रात्री फोन आला. उद्धवला माझ्याशी बोलायचे आहे, असे त्यांनी मला सांगितले. पण उद्धवचा फोन नंबर माझ्याकडे नाही. तुम्ही मला तिथे जावून फोन लावून द्या असे मी सांगितले. त्यानुसार दांगट गेले व उद्धवला फोन लावून दिला. त्यानंतर उद्धवशी बोललो. विचारपूस झाल्यानंतर उद्धव म्हणाला, तु पाहिले ना भाजपने कसा दगा दिला. त्यावर मी म्हटले अरे मला जर बाहेर असून सगळे कळते तर तुला कसे कळले नाही. बरं ते जाऊ दे आता काय करायचे, कारण वेळ उरलेला नाही. त्यानंतर उद्धव म्हणाला,
आपण तीन गोष्टी करू शकतो. त्या म्हणजे,
1. आपण एकमेकांशी चर्चा करू.
2. निवडणूक प्रचारात एकमेकांवर टीका करायची नाही.
3. तसेच निवडणुकीनंतर काय ते पुढचे पाहू
आम्ही दोघांनीही आमच्या पक्षातील नेत्यांची नावे एकमेकांना सांगितली. त्यांच्यात चर्चा होणार हे ठरलेले होते. या बोलण्यानंतर मी माझ्या सहका-यांशी चर्चा केली. आम्ही संध्याकाळपर्यंत एबी फॉर्मही थांबवले. पण दुसरा दिवस अखेरचा असल्याने मला एबी फॉर्म वाटप करावे लागले. आम्ही पाच वाजेपर्यंत उद्धवच्या फोनची वाट पाहिली. पण फोन आला नाही. त्यामुळे नंतर विषय बंद झाला.''
अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती दिली. या सर्व मुलाखतीतही राज ठाकरे यांच्या बोलण्यातून आपल्याला विचारणा झाली नाही, तसे झाले असते तर प्रतिसाद दिला असता असे त्यांना म्हणायचे असल्याचे जाणवले. त्यामुळे निवडणुकीनंतर या दोघांच्या एकत्र येण्याच्या शक्यतांना आणखी बळकटीच मिळाली आहे.