आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेला आणखी एक जोरदार झटका आमदार राम कदम अखेर भाजपमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालात पुरते पानिपत झालेल्या मनसेला ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी एक झटका बसला आहे. पक्षाचे मुंबईतील आमदार राम कदम यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. राम कदम यांची गेल्या पाच वर्षांची कारकीर्द पाहता आपल्या विधायक कामांपेक्षा विवादांमुळेच ते गाजले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या मनातून उतरलेले राम कदम वेगळा विचार करतील अशी चर्चा होतीच.
गेले काही दिवस भाजपच्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात असलेल्या कदम यांना प्रवेश करताना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही, असा जरी भाजपचा दावा असला तरी घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वसंत वाणी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
विधानसभेत गोंधळाने गाजले
२००९ मध्ये विधानसभेत आमदारांच्या शपथविधी सोहळ्यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना हिंदीतून शपथ घेण्यास विरोध करणारे राम कदम पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते. त्याप्रकरणी मनसेचे आमदार रमेश वांजळे आणि राम कदम यांना विधानसभेतून निलंबितही करण्यात आले होते. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांना या कामगिरीबद्दल शाबासकीही दिली होती. नंतर विधिमंडळाच्या आवारात एका पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी निलंबन झाल्यानंतर मात्र राज ठाकरेंची कदम यांच्यावर खप्पा मर्जी झाली होती. खुद्द पक्षाध्यक्षांनीच कदम यांच्याशी अबोला धरल्याने या वेळी त्यांचे तिकीट कापले जाणार अशीच चर्चा सुरू होती. त्यामुळे पक्षातूनच गेल्या काही दिवसांपासून कदम यांच्या मतदारसंघातल्या विरोधकांना बळ देण्याचे प्रयत्न सुरू होते.
राम कदम यांच्या विरोधात बाळा नांदगावकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश चुक्कल हे गेल्या काही दिवसांपासून घाटकोपर मतदारसंघात सक्रिय झाले होते. शिवाय स्थानिक नगरसेवक दिलीप लांडे यांनीही या मतदारसंघात तयारी सुरू केली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राम कदम यांनी भाजपच्या नेत्यांशी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. अखेर गुरुवारी पुण्यात कदम यांनी भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

राजसाहेबांवर श्रद्धा
महाजनांचे निकटवर्तीय अन् स्पर्धकही : एकेकाळीदिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे चिरंजीव राहुल महाजन यांचे जिवलग मित्र असलेल्या कदम यांनी गेली विधानसभा निवडणुक महाजन यांची कन्या आणि सध्या खासदार असलेल्या पूनम महाजन यांच्या विरोधात लढवली होती.
"राजसाहेब आणि शर्मिला वहिनी माझे श्रद्धास्थान आहे. त्यांच्यावरची श्रद्धा कायम राहील. पितृ पंधरवड्यात मला पक्ष सोडावा लागतोय म्हणजे माझ्यावर किती वाईट वेळ आली असेल याची कल्पना करा. राजसाहेबांविषयी माझी काहीच तक्रार नाही. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात प्रचंड कामे करुन, जनतेत लोकप्रिय असूनही माझे कौतूक झाले नाही, याचे वाईट वाटते.
रामकदम, आमदार(भाजप प्रवेशानंतर)