समाजकारण आणि राष्ट्रकारणासाठी सत्ताकारण ही झाली आदर्श स्थिती. अलीकडच्या काळात सत्तेचे आकर्षण हेच लोकांना राजकारणाकडे खेचून आणणारी प्रमुख बाब बनली आहे. सत्तेच्या मोहाने नात्यात दुरावा आल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकारणात समोर आली आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही काही मतदारसंघांत बहीण-भाऊ, काका-पुतण्या, दीर-भावजय, काकू-पुतण्या, सासरा-जावई आणि भाऊ- भाऊ एकमेकाविरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचे चित्र आहे.
परळी
बहीण v/s भाऊ
मुकुंद कुलकर्णी । बीड
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या व दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा ‘वारसदार’ ठरविणाऱ्या परळी मतदारसंघाकडे यंदा राज्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी चुलत बहीण-भावाचा सामना होत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी २००९ मध्ये
लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे पुतणे व जिल्हा परिषदेचे तत्कालिन उपाध्यक्ष धनंजय मुंडे यांनी या मतदारसंघातून विधानसभा लढविण्याची तयारी केली होती. मात्र मुलगी पंकजांसाठी गोपीनाथरावांनी त्यांना उमेदवारी नाकारल्याने धनंजय नाराज झाले होते. मुंडे काका- पुतण्यात दुरावा निर्माण होण्यात हे एक महत्त्वाचे कारण ठरले. मात्र त्यावेळी नाराजी दूर ठेवून धनंजय यांनी पंकजा यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली, निवडूनही आणले. त्यानंतर मुंडेंनी धनंजय यांना विधान परिषदेवर संधी दिली. पुतण्याची नाराजी ओळखून अजित पवारांनी धनंजय यांना राष्ट्रवादीत आणून
आपल्या पक्षातर्फे विधान परिषदेवर पाठवले. आता मुंडेंच्या पश्चात पंकजा व धनंजय या बहिण भावांमध्ये लढाई होत आहे.
पुढे वाचा... काका v/s पुतण्या