मुंबई- राज्यातीलपाच छोट्या पक्ष-संघटनांनी एकत्र येत बुधवारी "महाशक्ती' नावाच्या एका नव्या आघाडीची घोषणा मुंबईत करण्यात आली. रिपाइंच्या गवई गटाचे डॉ.राजेंद्र गवई या आघाडीचे नेते असून राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा ही आघाडी लढवणार आहे.
अवामी विकास पार्टी, ओबीसी-एन.टी. पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन क्रांती दल, आझाद विदर्भ सेना आणि मायनॉरिटी डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया असे पाच छोटे पक्ष-संघटना या महाशक्ती आघाडीत एकत्र आले आहेत.
२८८ पैकी २०० जागा रिपाइं (गवई गट) आणि अवामी विकास पार्टी लढवणार आहे. स्वतंत्र विदर्भ, दंगामुक्त राज्य, ओबीसी जनगणना, मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन आणि १० रुपयांत पोटभर जेवण असा या आघाडीचा २५ कलमी जाहीरनामाही प्रकाशित करण्यात आला.
डॉ. राजेंद्र गवई मागच्या विधानसभेला "रिडालोस'मध्ये होते. लोकसभेला त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत स्वबळावर निवडणूक लढवली. आगामी विधानसभेसाठी बसपा आणि भारिप-बहुजन महासंघ यांच्याशी आघाडीचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांना कुणीही दाद दिली नाही. त्यामुळे त्यांनी आता महाशक्ती आघाडीची घोषणा केली.
परळीतून मुंडेंना तिकीट
याआघाडीने बुधवारी १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सुबोध वाघमोडे (दक्षिण सोलापूर), पूजा सूर्यवंशी (भुसावळ), प्रताप अभ्यंकर (अचलपूर), बळवंत वानखेडे (दर्यापूर), पाटलोबा मुंडे (परळी वैजनाथ), राजेंद्र ठाकरे (जळगाव शहर), के. एल. नन्ने (साकोली), एजाज मुकादम (भायखळा), मकसूद पटेल (नांदेड उत्तर), सर्फराज खान पठाण (नाशिक मध्य) आणि अल्ताफ शेख (विक्रोळी) यांचा त्यात समावेश आहे.