आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण: सत्तासुंदरीची वरपरीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐन पितृपक्षात सरकारमान्य रा. रा. संपत साहेबांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांचा बिगुल फुंकला, तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 'अशुभ मुहूर्तातील निवडणुकांची पथ्ये' अशी पुस्तिकाही एका कुडमुड्या ज्योतिषाने लगेच बाजारात आणली. ती हातोहात खपली. नंतर युतीचे तीनतेरा आणि आघाडीचे चारचौदा झाले. त्यामुळे त्या पुस्तिकेच्या तीन-चार आवृत्त्या काढाव्या लागल्या. यातील सत्तासुंदरीचे वशीकरण हे प्रकरण अत्यंत गाजते आहे. अनेकांनी त्याची पारायणे केली आहेत. काहींनी तर यातील शब्दनशब्द पाठ केला आहे. सत्तासुंदरीला वश करण्यासाठीच ही सर्व खटाटोप असल्याने त्याची चर्चा जास्त रंगते आहे.

हे सर्व एका कोप-यातून पाहणा-या सत्तासुंदरीने आता वरपरीक्षा घेण्याचे ठरवले व ती परीक्षेसाठी बाहेर पडली. प्रत्येक इच्छुकाला एक प्रश्न विचारायचा, त्याचे उत्तर आले नाही तर दुस-याकडे वळायचे असे ठरले.

सर्वप्रथम ती आली सिंचनमित्र दादांकडे. दादांनी त्या ठिकाणी सत्तासुंदरीचे हसून स्वागत केले. ‘बोला काय सेवा करू या ठिकाणी,’ दादांनी जास्तीत जास्त नम्रता आणण्याचा प्रयत्न करीत विचारले. सत्तासुंदरीने विचारले, ‘राज्यात एकूण किती घोटाळे झाले व त्यात किती रक्कम झिरपली?’ दादांनी खूप विचार केला मात्र, घोटाळे आणि रकमेचे बॅलन्सशीट काही जुळेना. दादांना उत्तर देता आले नाही.

सत्तासुंदरी मग नितीन भौ नागपूरकरांकडे पोहोचली. भौ नेहमीप्रमाणे खाद्यपदार्थांवर ताव मारत बसलेले. सत्तासुंदरीला पाहताच ते अदबीने उभे राहिले, तिच्यासमोर पंचपक्वान्नाने भरलेले ताट सरकवले. मात्र, सत्तासुंदरीने त्याकडे दुर्लक्ष करत भौना प्रश्न विचारला, ‘देशात एकूण किती उड्डाणपुलांची पूर्ती झाली आहे?’ अचानक आलेल्या प्रश्नाने व त्यातील ‘पूर्ती’ शब्दाने भौंची तारंबळ उडाली, मती गुंग झाली, डोळ्यासमोर खाल्लेले सर्व पदार्थ फिरू लागले. नितीनभौना उत्तर देता आले नाही. मग सत्तासुंदरी श्रेष्ठीमान्य बाबांकडे आली. बाबांनी केसांचा कोंबडा ठीक करत सत्तासुंदरीचे स्वागत केले व नेहमीच्या सवयीनुसार विचारले ‘मॅडमचा काय निरोप?’ सत्तासुंदरीने त्याकडे दुर्लक्ष करत सांगितले, ‘मी आता एक प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले, तर सत्तेची माळ तुमच्या गळ्यात पडेल.’ बाबांना ब-याच दिवसांत प्रथमच आशेचा किरण दिसला. बाबांनी खुश होत होकार दिला. सत्तासुंदरीने बाबांकडे रोखून पाहत प्रश्न विचारला, ‘दादांच्या किती फायलीत घोटाळा आहे व त्यावर किती सह्या करणे बाकी आहे?’ बाबांच्या पोटात एकदम गोळाच आला. एकतर घोटाळेच घोटाळे त्यामुळे त्या फायलींची नक्की संख्या माहिती नाही आणि बरेच महिने सही केली नसल्याने आपली सही नेमकी कशी, हेच बाबांना आठवेना. शेवटी सत्तासुंदरी कंटाळली व बाबांच्या दालनातून बाहेर पडली. आणखी वरपरीक्षा घेण्यासाठी....

रिंग मास्टर