आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिंगण - तोंड दाबून बुक्क्यांचा मार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्री ऐन पितृपक्षात आमदारकीच्या निवडणुका जाहीर झाल्या. जागावाटपाचा सवतासुभा पेटला. रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या युतीचे मधल्या काळात दोनाचे सहा झाले. कमळाबाई बाणदादा यांच्यात जागांची रस्सीखेच सुरू झाली, तशी शीघ्रकाव्याचार्य रामदासभाऊ, ऊसभूषण टिपरीकर शेट्टीअण्णा, जानकार नेते महादेवबप्पा, संग्रामबहाद्दर मेटेदादा यांच्यात घालमेल सुरू झाली.

महायुतीत सर्वात जुने असलेल्या शीघ्रकाव्याचार्यांनी महादेवबप्पांना फोन लावला. महादेवबप्पा युती टिकावी आपल्या पदरात चांगल्या जागा पडाव्यात हे मागणं मांडण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाकडे निघाले होते. बप्पांचा फोन वाजला, बप्पांनी फोन कानाला लावत म्हटले,‘ काय काव्याचार्य, काय म्हणता?’
‘कशाचं काय अन् कसचं काय, त्या दोघांच्या भांडणात आपल्या पदरी काय नाय...’
‘बप्पा ही काय चारोळ्या ऐकवण्याची वेळ हाय का..?’
‘काय करता मग, बाणाचं अन‌् कमळाच जुपलंय, आपल्याला कोण विचारतंय...’
‘म्या तर खंडुबाला मागणं घालाय निघालोय, खंडेरायाच्या मनी असलं तर व्हईल सारं ठीक..’
‘ठीक आहे.’ म्हणत काव्याचार्यंानी फोन ठेवला. पण त्यांची घालमेल काही थांबेना. त्यांनी शेट्टीअण्णांना फोन लावला.
शेट्टीअण्णा उसाच्या भावाच्या चिंतेत असतानाच रिंग वाजली.. अण्णांनी फोन उचलला अन् थेट सुरू केले.. ‘टनाला ३००० भाव दिला नाही तर उसाच्या टिपरीने फोडून काढू...’ तिकडून काव्याचार्यांना कळेना, ते म्हणाले ‘अहो अण्णा, मी रामदास बालतोय...’
‘अरे, असं व्हय, मला वाटलं सरकारच बोलतंय, बोला काव्यभूषण ..’
‘इकडं कमळ-बाणाचं काय मिटना, अन् घोळ काय संपंना..’
‘जाऊ द्या हो, नायतर आपलं आपण बघून घेऊ, कुठवर वाट बघायची म्हणतो मी...’
‘तस नव्हं, तुमचं ठीक हाय..आमी कुठं जावं..’
‘बघू काय तर तोडगा निघंलच की, बरं ठेवतू, कार्यकर्ते ताटकळ्याती...’
अण्णांनी फोन ठेवला.. पण रामदासभाऊंना राहवेना. त्यांनी मेटेदादांना फोन लावला.
‘दादा कसं होणार’
‘काय होणार.. अरे ते दोघे मोठे.. त्यांनी समजुतीनं घ्यायला हवं..’
‘खरंय, नायतर हातचा घास जायचा सत्तेचा...’
‘तसं नाय भाऊ ते, आपण चौघांनी लय चळचळ करुने म्हणून तर त्यांचं हे नाटक चाललं नसावं...’
तशी काव्याचार्यांची ट्यूब पेटली अन‌् त्यांना फ्रेश चारोळी सुचली..
‘बाण-कमळाच्या जागावाटपाचे फार्म्युले फार,
घटक पक्षांना मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार..’
मेटेदादांनी हसून त्याला दाद दिली फोन कट केला.