आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण - आता २८८ चं कोडं

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भवानीच्या दरबारात घट बसले. त्याच दिवशी महायुती आणि आघाडीत फाटाफूट झाली. बाण आणि कमळाबाईचं वाजलं, तर हातावरनं घड्याळही उतरलं. हे सारं झालं खरं आता अर्ज भरायला एकच दिवस शिल्लक राहिला आहे. सर्व ठिकाणी लढायला २८८ माणसं आणणार कोठून? असा प्रश्न सर्वच पक्षांसमोर उभा ठाकला आहे. या नव्या काळजीनं सर्वच पक्षातील सर्वच सरदार हैराण झाले आहेत. जो तो आपआपल्या परीनं २८८ चे कोडं सोडवायचा मागे लागला आहे.

हातकरांच्या छावणीत नेहमीप्रमाणे सुस्तीत मामला चालला होता. श्रेष्ठीमान्य कर्हाडकर माणकोजीराव उमेदवारांच्या निवडीत गुंतले होते. ११८ जण तर झाले उरलेल्या १७० जागांसाठी शोध सुरू झाला. पक्षांच्या जुन्या निष्ठावंतांची यादी तीनदा वाचून झाल्यानंतर कसेबसे दहा वीस नावांवर एकमत झालं. पण गाडं पुढं हालेना. तिकडं घड्याळदादाच्या मंडपात मोठी गर्दी दिसत होती. हा माझा भाचा, हा माझा मेव्हणा, हा माझा पुतण्या, हा माझा मामा, काका, दादा, भाऊ, सोम्या,गोम्या अशी नातेवाइकांची जत्राच तेथे भरली होती. त्यातून निवडून येण्याचा निकष लावत पुलोदस्वामी बसले होते, पण २८८ दूरच होतं. बाणरावांच्या गडावर मुजऱ्यावर मुजरे झडत होते. रिक्षावाले, टपरीवाले, छपरीवाले, गल्लीदादा ते कार्पोरेट सेक्टरमधील जाणीमानी मंडळी होती. मावळ्यांनी अमित शहा मुर्दाबादचा नारा देत गड दणाणून सोडला होता. मात्र सेनेचे धाकले महाराज चिंतेत होते कारण २८८ चे लक्ष्य साधणारे बाण भात्यात नव्हते. दिल्लीच्या यमुनेची राणी झाल्यापासून कमळाबाईचा तोरा वाढला आहे. कमळाबाईच्या घाटावर ही गर्दी जमलेली. सर्वांनी नाकारलेल्यांना हा मोठा आधार होता. पक्षाचे चतुर फडणीस, नाथाभाऊंनी यादीवरुन नजर मारली. काही ओळखीच्या नावावर शिक्का मारला. तरीही फडणीसांचा चेहरा खुलेना कारण २८८ ची फिगरच येईना. मग इच्छुकाच्या मुलाखती घेण्याचे ठरले. त्यांनी एका इच्छुकाला बोलावले, मुलाखत सुरू झाली
फडणीस - राजकारणाचा, लोकसंपर्काचा अनुभव आहे का?
इच्छुक - तर, रोज सकाळी निम्म्या शहरातील लोकांना भेटतो
फडणीस - यासाठी काय करता तुम्ही ?
इच्छुक - वेगळे काय नाय, आपला भाजी विक्रीचा हातगाडा हाय, किमान दहा वार्डात आपली मते हालायची नाय, याची गॅरंटी..
फडणीसांनी कपाळावरचा घाम पुसला तर नाथाभाऊंनी कपाळावर हात मारला. युती तोडून आपलं चुकलं तर नाय ना असा विचार दोघांच्याही मनात एकदाच आला...