आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण: हमारे पास लक्ष्मण है..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महायुती तुटल्यापासून राजमान्य राजेश्री फोटोग्राफर भूषण, शिवबंधनकार श्रीयुत धाकले महाराजांच्या जिवाला चैन नव्हती. सेनेची व राज्याची सर्वच धुरा त्यांच्यावर होती. राज्यभर भाषणे करत झंझावाती दौरा करण्याची योजना महाराजांच्या मनात घोळत होती. युवराज आदित्यकडून त्यांनी टॅबवर सर्व प्लॅनिंगची ‘पीपीटी’ टाकून घेतली होती. त्यांनी आपल्या पिताश्रींच्या सर्व भाषणांच्या सीडी आधीच मागवून घेतल्या होत्या. त्यातील एक भाषण ऐकून झाल्यानंतर धाकल्या महाराजांनी दालनातील सुरईत ठेवलेले वाळा मिश्रित पाणी प्यायले.
ऐन ऑक्टोबर हीटमध्ये त्यांना या पाणी प्राशनाने फ्रेश वाटायला लागले. त्यांनी टीव्ही ऑन केला. एका वाहिनीवर कमळाबाईचे चतुर पंडित जोरदार भाषण देत होते.... राज्यातील लंकारूपी सरकारच्या दहनासाठी आपण सज्ज असावे. त्यासाठीची तयारी आम्ही केली आहे. लंकादहनासाठी बिभीषण आमच्याकडे आहेत... धाकल्या महाराजांनी टीव्ही बंद केला.
त्यांचे मन पुन्हा सैरभैर झाले. बिभीषणाला तोडगा काय? या विचाराने त्यांचा संभ्रम जास्तच वाढला. तेवढ्यात युवराज आदित्य तेथे दाखल झाले. त्यांनी महाराजांच्या चेह-यावरील चिंता लक्षात घेत विचारले,
‘काय पिताश्री, आता कशाची काळजी?’
‘अरे, तुला नाही कळणार या चिंता’
‘कशाबद्दल बोलताय तुम्ही पिताश्री?’
‘अरे, राज्यात मी एकटा पडलोय.'
‘कोण म्हणतंय तुम्ही एकटे आहात, मी आहे की तुमच्या मागे माझ्या तरण्याबांड मावळ्यांसह..’ युवराजांनी धीर दिला.
‘पण तुम्ही कशाची काळजी करत होता पिताश्री?’
‘अरे बाबा, त्या चतुर फडणीसांनी रामायणातले दाखले द्यायला सुरुवात केलीय भाषणातून...’
‘मग आपण महाभारतातले देऊ, त्यात काय एवढं?’
‘तसं नाही, त्यांनी बिभीषणाला आणलंय रिंगणात.’
‘मग काय झालं?’
‘आपणही तगडा दाखला द्यायला हवा, तो सुचत नव्हता म्हणून जरा काळजीत होतो.’
‘रामायणातलाच हवा का महाभारतातला चालेल.’
‘रामायणातला असला तर जास्त चांगलं, म्हणजे कसं २५ वर्षांच्या मैत्रीला शोभेल असा दाखला होईल.’
युवराजही मग विचारात गढले व व्हॉट्सअ‍ॅप पाहत इकडून तिकडे फे-या मारू लागले. धाकल्या महाराजांनी रिमोट उचलून एसी ऑन केला. थंड वा-याच्या झुळकीने त्यांना बरे वाटू लागले... तेवढ्यात युवराज जोरात ओरडले,
‘पिताश्री, त्यांच्याकडे बिभीषण आहे तरी आता घाबरायचं नाही, तुम्ही भाषणात सांगायचे, उनके पास बिभीषण आहे, तर आमच्याकडे लक्ष्मण आहे...’ महाराजांना काही कळेना. युवराजांनी खुलासा केला... ‘राजकाका केव्हा कामाला येणार’... आणि युवराजांच्या डोकॅलिटीचे कौतुक करत महाराजांनी सोफ्यावर बसकण मांडली.
-रिंग मास्टर