आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण: काकांची पहिली पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आघाडी तुटल्यापासून घड्याळ्याच्या मंडपात नवा उत्साह संचारला होता. सिंचनमित्र दादा अगदी खुशीत होते. पुलोदस्वामी आपल्या खोलीत निवडणुकीनंतरची समीकरणे मांडण्यात गुंतले होते. सिंचनभूषण प्रदेशाध्यक्ष सुनीलराव जाहीरनाम्यावरून शेवटचा हात मारण्यात मग्न होते. मफलरकार छगनभाऊ गोदाकाठचा परिसर सभांनी पिंजून काढत होते. तिकडे इस्लामपुरात जयंतराव मामा अडकून राहतील म्हणून विरोधकांनी केलेली व्यूहरचना कशी फोडता येईल यावर जयंतराव मामा व गृहकर्तव्यदक्ष आबा यांच्यात गंभीर चर्चा रंगली होती.
एकंदरीत घड्याळाचे काटे व्यवस्थित फिरत असल्याचे चिन्ह होते. सिंचनमित्र दादांची सटकलेली आता ब-यापैकी स्थिरस्थावर झाली होती. कोणत्या चॅनलला कधी व कोठे मुलाखत द्यायची, कोणत्या पेपरवाल्याला कोणता मुद्दा हायलाइट करायला सांगायचा याची सारी टिपणे काढण्यात दादांचा वेळ मजेत जात होता. श्रेष्ठीमान्य बाबांना कसे घेरायचे याचा विचार दादा सातत्याने करत होते. बाबांना त्यांच्याच मतदारसंघात धूळ चारायची असा चंग दादांनी बांधला. त्यादृष्टीने ते कामाला लागले. एरवी काकांपासून चार हात लांब राहणा-या दादांना आता कराडमधील काकांचा चांगला आधार वाटू लागला होता. तेवढ्यात दादांचा नोकर पेपरवाले, चॅनलवाले मुलाखतीला आल्याची वर्दी घेऊन आला. ते ऐकताच दादांना नवे स्फूरण चढले. दादा उत्साहात म्हणाले, ‘बसायला सांगा सर्वांना त्या ठिकाणी, मी आलोच.’ काही वेळाने दादा त्या ठिकाणी हजर झाले. हसतमुखाने त्यांनी सर्वांना नमस्कार केला व सर्व पत्रकारांसाठी चहापानाची ऑर्डर दिली.
कोणी काही प्रश्न विचारायच्या आतच दादांनी बॅटिंग सुरू केली, ‘मला माहितीय, तुम्ही काय विचारण्यासाठी आलात या ठिकाणी. राज्यातील बुजुर्गांविरुद्ध आम्ही उमेदवार देणार नसल्याचे आमचे ठरवले आहे त्या ठिकाणी. त्यामुळे गणपतदादादा, विलासकाकांना आम्ही पाठिंबा देणार आहोत त्या त्या ठिकाणी. एक बटण दाबा आणि दोन आमदार मिळवा, अशी घोषणा आहे आमची...’ दादांची बॅटिंग सुरू असताना आतल्या दालनात बसलेले काका निवडणुकीनंतर घड्याळाला बहुमत मिळाले तर कोणाला मुख्यमंत्री करायचे याचा विचार करत बसले होते. बाहेरची दादांची बॅटिंग ते मनापासून ऐकत होते. दादा शांत मुद्रेने प्रसारमाध्यमांना सफाईदारपणे सामोरे जात होते. दादा आता बरेच प्रगल्भ झालेले काकांना जाणवले. त्यांनी आपल्या हातातील भावी मुख्यमंत्र्याच्या यादीवर नजर टाकली व हळूच दादांच्या नावापुढे तीन स्टार मारले..
-रिंग मास्टर