आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायमिंग अन् टाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात आता निवडणुकांनी रंग भरायला सुरुवात केली आहे. राजकीय जत्रेतील दुकानात अनेक हौसे, गवशे, नवशे आपापली चिन्हे मांडून बसले आहेत. तिकडे समुद्राच्या किनारी ‘कृष्णकुंज’ प्रासादात वास्तव्यास असणारे राजमहाराज यांनीही जत्रेत जोमाने भाग घेतला आहे. इंजिनाचे होलसेल व्यापारी असणाऱ्या राजमहाराजांच्या दुकानात ब्ल्यू प्रिंट नामक दस्तऐवजही किरकोळ विक्रीला ठेवण्यात आले आहेत. एरवी आपल्या निवासस्थानी आपल्या आवडत्या श्वानाबरोबर एसीच्या थंडाव्यात सारखे धुमसणारे राजमहाराजांनी आता महाराष्ट्र उभा-आडवा पिंजून काढण्याचे ठरवले आहे. त्यांनी त्यासाठी प्रथम विदर्भ निवडण्याचे ठरवले. त्याप्रमाणे राजमहाराज इंद्रनगरी अमरावतीत दाखल झाले. इंद्रनगरीत दाखल होताच आपली निवड चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. अलीकडे राजमहाराजांचे टायमिंग व निवड नेहमी चुकायला लागली आहे. त्यांनी जिवापाड मेहनत करून तयार केलेली महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट सादर करण्याच्या मुहूर्तावरच युती तुटली. त्यामुळे चॅनलांचा सारा फोकस युतीवर राहिला. ब्ल्यू प्रिंटचा गवगवा म्हणावा तसा झाला नाही. तेव्हा टायमिंग चुकले. इंद्रनगरीत सूर्यनारायण आग ओकू लागला. विश्वामित्राच्या उन्हाळी झळांनी अंगाची लाही लाही होत होती. अशा उन्हात राजमहाराजांच्या सभा ऐकायला येणार कोण ? एरवी गर्दी हाच यूएसपी असलेल्या ‘निर्माण’कारांना असे मूठभर माणसांसमोर भाषण करणे अवघडल्यासारखे होऊ लागले. मुद्दे सुचेनात, ब्ल्यू प्रिंट उन्हांच्या झळांनी काळी पडू लागली. अमरावतीत झाले ते यवतमाळ दौऱ्यात दिसले. मग राजमहाराजांनी संपत साहेबांना धारेवर धरले. ऐन सणासुदीत, टळटळीत उन्हात निवडणुका घेण्यावरून त्यांनी साहेबांची खरडपट्टी काढली. मग अनेकांच्या नकला करून झाल्या. महाराष्ट्राच्या विकासासाठी नवनिर्माण किती आवश्यक आहे हे पटवून झाले. मात्र, तरीही गर्दी काही वाढेना. ऐन हस्ताच्या उन्हाळ्यात विदर्भाची केलेली निवड चुकल्याचे राजमहाराजांना कळून चुकले. आता अचूक टायमिंग आणि निवड साधायचीच याची गाठ मनाशी पक्की बांधून राजमहाराज औरंगाबाद मुक्कामी दाखल झाले. तेथे जुन्या आठवणी त्यांच्या मनी दाटल्या. काकामहाराजांबरोबरचे झंझावाती दौरे, ती भाषणे, त्याला जमणारी गर्दी मनी दाटली. निवडणूक निकालांनंतरचे अचूक टायमिंग साधण्याचे त्यांनी मनोमन ठरवले. आता राहिली निवड. त्यांच्यासमोर अनेक नावे आली. मात्र, एकाच नावावर त्यांचे लक्ष केंद्रित झाले... ते नाव म्हणजे सेनेचे धाकले महाराज शिवबंधनकार उद्धोराजे... त्यांनी क्षणात विचार केला... टाळीसाठी पुढे केलेल्या हातावर टाळी द्यायची... हीच योग्य वेळ आहे..
-रिंग मास्टर