आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नपूर्तीचा मंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत भारताचा डंका वाजवून सर्वमान्य रा. रा. प्रधानाचार्य नरेंद्र महाराज मायदेशी परतले. मग नरेंद्र महाराजांनी महाराष्ट्राच्या रिंगणात सभांचा धडाका लावण्याचा कार्यक्रम जाहीर केला. ‘बाण’दादाशी फारकत झाल्यापासून सातत्याने टीकेचे बाण सहन करणा-या कमळाबाईला त्यामुळे हायसे वाटले. नरेंद्र महाराजांच्या लाटेने आता कमळ तरणार, या आशेने पक्षाचे चतुर पंडित फडणीस, नाथाभाऊ भुसावळकर, नितीन भौ नागपूरकर, विनोदवीर मुंबईकर आदी सरदार खुश झाले. सर्वांनाच आपण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसून आदेश सोडत आहोत, अशी स्वप्ने हस्ताच्या टळटळीत उन्हात पडू लागली. नरेंद्र महाराजांचा दौरा सुरू झाल्याने दर सहा-सात तासांनी पडणारे स्वप्न आता दर तीन तासांनी पडू लागले. नरेंद्र महाराजांनी बीड, औरंगाबाद, मुंबईचे गड गाजवले. नरेंद्र महाराजांना निरोप देऊन हे सरदार कमळाबाईच्या मुख्यालयी आले. एसीच्या थंड झुळकांनी नितीन भौची कळी खुलली, त्यांनी ऑर्डर दिली,
‘कोण रं तिकडं, ऐ भैताड्या, जरा थंडगार लस्सी आण बे आम्हास्नी.’
तसे नाथाभाऊ चतुर पंडितांना म्हणाले, ‘मले तर चिंता वाटून राहिली आता.’
‘कशाची ओ नाथाभाऊ?’ पंडितांनी सारे कळून युक्तीने विचारले.
तसे विनोदवीर गंभीर चेह-याने म्हणाले, ‘आता तर पहिला टप्पा आहे, काळजीचे कारण नाही.’
‘असं कसं म्हणता विनोदराव?’ नाथाभाऊंची चिंता कायम होती.
‘काहून काळजी करून राहिले रे तुमी, मस्त लस्सी प्यायची सोडून, अन् जेवायले काय सांगायचं ते सांगून द्या आताच, काहून उगाच काळजी करता बे,’ नितीन भौनी लस्सीचा ग्लास तोंडाला लावत गुगली टाकली.
‘तस नाय भौ, आतापासनं क्लिअर झालेलं बरं,’ चतुर पंडित म्हणाले.
‘पहिल्या टप्प्यातील प्रचारानंतर बरंचसं चित्र स्पष्ट होईल,’ विनोदवीरांनी माहिती दिली. तसे नाथाभाऊ व चतुर पंडित एकमेकांकडे बघून हसू लागले. नितीन भौनी एका झटक्यात लस्सीचा दुसरा ग्लास संपवला व तोंडावरून उलटा हात फिरवत सफाई केली. ‘काहून टेन्शन घेऊन राहिले बे तुमी, माह्याकडून तर समदं क्लिअर केलं ना बे मी, मले राज्यात इंटरेस्ट नाय ते, मग काहून काळजी करून राहिले बे.’
‘तसं नाय भौ, नरेंद्र महाराजांनी सारं काही सांगितलं, पण मुख्यमंत्री कोण हे सांगितलंच नाही,’ नाथाभाऊंनी सरळ मुद्द्याला हात घातला.
"त्याचं काय हाय, ते तं मलेबी माहीत नाय, त्यो गुजराती शहाबाबाबी काय चाल खेळून राहायलाय तेबी कळंना, भगवानगडावर जोरात भाषण ठोकलंनं त्यानं,’ नितीन भौनी स्पष्टीकरण देत टीव्ही ऑन केला.
चॅनलवर बातमी झळकली- ‘पंकजा मुंडे यांना मोदींचा कानमंत्र...’ बातमी ऐकताच सर्व सरदारांना एसीच्या गारव्यातही घाम फुटला..

-रिंग मास्टर