आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण: स्वच्छता अभियान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत भारताचा डंका वाजवून कमळाचार्य नरेंद्रमहाराज मायदेशी परतले. दुस-या दिवशी मोहनलाल (सॉरी.. मोहनदास) गांधी यांची जयंती. त्यामुळे कमळाचार्यांनी विचार केला, नाव चुकले, आता प्रायश्चित घ्यायलाच हवे, आत्मक्लेष करायला हवा. अलीकडेच सिंचनमित्र दादांनी केलेल्या आत्मक्लेष गाजला होता. त्यामुळे कमळाचार्यांनी आत्मलक्लेष व प्रायश्चित घ्यायचे ठरवले व सफाई अभियानाचा उदय झाला. झाले सारे काही स्वच्छ करायचे. म्हणजे मग सारे सुरळीत होईल, असा संदेश द्यायचा विचार कमळाचार्यांनी केला. सकाळी सकाळी त्यांनी झाडू हाती घेतला व दिसेल त्यावर मारण्यास सुरुवात केली. हा हा म्हणता हे अभियान पेटले. त्यातच महाराष्ट्र देशी निवडणूक जाहीर झालेली. कमळाचार्यांना आयताच मोका. निवडणुकीच्या रिंगणात घाणीला मोठा वाव. त्यामुळे अभियान राबवण्यास ही जागा उत्तम असल्याचे कमळाचार्यांनी हेरले. दौरा सुरू झाला. प्रत्येक सभेत सफाईचे आवाहन कमळाचार्यांकडून होऊ लागले.
इकडे पक्षाचे चतुर पंडित फडणीस, नाथाभाऊ भुसावळकर, नितीन भौ नागपूरकर, विनोदवीर मुंबईकर आदी सरदार या अभियानाने मात्र हैराण झाले. कमळाचार्यांनी पंकजाताईंना स्वच्छतेचा मंत्र दिल्याची बातमी एव्हाना सर्वत्र झळकली होती. त्यामुळे जो स्वच्छता जास्त करेल त्याला मुख्यमंत्रिपदाची माळ मिळेल, असा अर्थ चॅनेलवरील पंडितांच्या चर्चेतून चवीने व्हायला लागली. तसे कमळाबाईच्या सर्व सरदारांनी बैठक बोलावली. प्रत्येकाने आपापला भाग स्वच्छ करायचा असे त्यात ठरले. चतुर पंडितांकडे विदर्भ आला, नाथाभाऊंकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. विनोदवीर मुंबईकरांनी कोकणपट्टा घेतला. मराठवाड्याचा प्रश्न कमळाचार्यांनी कानमंत्राने मिटवला होता. झाले, सर्व जण कामाला लागले. नाथाभाऊंनी सर्वप्रथम जळगाव, भुसावळ रेल्वेमार्ग व स्थानकाची स्वच्छता हाती घेतली. कारण येथूनच सर्व गाड्या थेट दिल्लीला जातात, त्यामुळे आपले काम सर्वप्रथम दिल्लीत दिसेल असे नाथाभाऊंना मनापासून वाटत होते. चतुर पंडितांनी संघ कार्यालय परिसरात झाडू फिरवून सलामी दिली. आधी कोकणपट्टी साफ करावी की मुंबई या विचारात विनोदवीर गंभीरपणे विचार करू लागले. पश्चिम महाराष्ट्रात समाजभूषण महादेवबप्पा, शेट्टीअण्णा कामाला लागले होते. या सर्व धामधुमीत नितीन भौ मात्र शांतपणे खाद्यपदार्थांवर ताव मारत फोनवरून सूचना देत होते, ‘काय बे भैताड्या राज्यावाले सारे उड्डाणपूल रात्रीत साफ झाल्ये पाहिजे मल्यावाला, काय समजले काय बे...’ त्यांनी आपल्या मंत्रालयातही फोनवरून सूचना दिल्या. देशातले उड्डाणपूल स्वच्छ झाले पाहिजे बे लक्षात ठेवा, नाय तर लक्ष्मी नाराज व्हइल, असा निरोप त्यांनी दिला होता. या सर्व धामधुमीत जनता मात्र खुश होती. तरुणाईने व्हॉट्सअॅपवर मेसेज टाकायला सुरुवात केली... मुख्यमंत्री कोणी का होईना, पण या अभियानाने.. स्वच्छ केला महाराष्ट्र माझा!
-रिंगमास्टर