आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण: कमळावर काटेरी बाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमळाचार्यांनी दिल्लीत सफाई करून महाराष्ट्रदेशी प्रचार सुरू केला. ‘शत प्रतिशत भाजप’ असे थेट न सांगता त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र कमळाची शेती फुलली पाहिजे, म्हणजे विकासाचे गेट उघडे राहील, असे सांगितले. कमळाचार्यांच्या या भाषणांनी व आवाहनाने राज्याचे जाणते राजे कृषिभूषण पुलोदस्वामी, सेनेचे धाकले महाराज, कृष्णकुंजनिवासी राजमहाराज हे सर्व जण सजग झाले. त्यात हातकरांनी हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने या तिन्ही राजांच्या डोक्यात ऐन कोजागरीदिवशी लख्खकन प्रकाश पडला. अरे, हा तर प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा डाव आहे. त्यामुळे तिघेही कमळाचार्यांवर तुटून पडले. पुलोदस्वामींनी कमळाचार्यांना शेतीचे धडे दिले. त्यांना शेतीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगितले. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी सिंचनमित्र दादांना मोदींच्या नावाचा सातबारा शोधण्याचे फर्मान दिले. तिकडे सेनेचे धाकले महाराज आई भवानीच्या अंगणात गरजले, ‘अफजलखानाची फौज महाराष्ट्राचे तुकडे करायला आली आहे’. राजमहाराजांनी तर कमळाचार्यांची पार लायकीच काढली. गल्लीगल्लीत कमळाचार्य ‘मेरे बंधू’ करत फिरत असल्याचे आपल्याला दिसत असल्याचा दृष्टांत त्यांनी दिला. प्रचाराची रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच पुलोदस्वामींनी सेनेचे धाकले महाराज व राजमहाराजांना कॉन्फरन्समध्ये जोडले व मोबाइलवरून संपर्क साधला. ‘अहो राजे, काय चाललंय या राज्यात,’ पुलोदस्वामींनी विचारले. आता दुस-या बाजूला दोघेही राजे असल्याने त्यांनी नेमके कोणाला विचारले हे न कळून धाकल्या महाराजांनी उत्तर दिले,‘ते आम्ही पाहतोच आहोत, अफजलखानाची फौज स्वराज्यावर चालून आली आहे.’
राजमहाराज म्हणाले, ‘खळळ खट्याक करून टाकू, शेवटी हा मराठीजनांचा प्रश्न आहे’. त्यावर पुलोदस्वामींनी दोन्ही राजांना शांत केले व म्हणाले ‘राजेहो, प्रसंग मोठा बाका आहे. आपण छोट्या पक्षाचे. आपल्याला सर्वांना खिंडीत
गाठण्याचा हातकरांचा व कमळाबाईचा विचार आहे. तेव्हा सबुरीने घ्या.’ सेनेच्या धाकल्या महाराजांनी त्यास सहमती दर्शवत विचारले,
‘तुम्ही ज्येष्ठ, बुजुर्ग; शिवाय आमच्या पिताश्रींचे मित्र, तेव्हा तुम्ही सांगावे व आम्ही ऐकावे.’ राजमहाराजांनी नरमाईने घेत, पुलोदस्वामींचा मान राखत सहमती सुनावली. पुलोदस्वामींनी मग गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली, ‘राजेहो, यातून सुटका करून घ्यायची असेल तर एकच मार्ग आहे. आपण सर्व जणांनी टार्गेट एकच ठेवायचे ते म्हणजे कमळाचार्य. हातकरांमध्ये आता पहिल्यासारखा जोर राहिलेला नाही. तेव्हा कमळाचार्यांवर तुटून पडू. निकालानंतर एकत्र बसू. नव्या जोमाने आघाडी स्थापन करू व सुखाने पाच वर्षे राज्य करू. एकंदरीत सत्तेकडे जाणा-या इंजिनात बसून, घड्याळाच्या काट्यांचे बाण कमळावर सोडू, मग समजेल त्यांना.... कसा आहे महाराष्ट्र माझा?’ कॉन्फरन्स कट झाली आणि सर्वच नव्या योजनेच्या कामाला लागले.
रिंग मास्टर