आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण भाग -2 : सत्तासुंदरीची ‘वर’परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्तासुंदरीने आता वरपरीक्षा घेण्याचे ठरवल्याचे तुम्हाला माहिती आहेच. पहिल्या दिवशी सिंचनमित्र दादा, नितीन भौ नागपूरकर आणि श्रेष्ठीमान्य बाबा या तिघांची परीक्षा तिने घेतली. प्रत्येक इच्छुकाला एक प्रश्न विचारायचा. त्याचे उत्तर आले नाही तर दुस-याकडे वळायचे. या नियमात पहिले तिघे न बसल्याने सत्तासुंदरीपुढे इतरांकडे जाण्यावाचून मार्ग नव्हता. तिने सकाळी सकाळीच कृष्णकुंज गाठले. सभा घेऊन थकूनभागून झोपलेले राजमहाराज नुकतेच उठले होते. मस्त चहाचे घोट घेत ते पेपर वाचत बसले होते. तितक्यात सत्तासुंदरी तेथे आली. तिला पाहताच राजमहाराजांनी तिच्यावरच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, ‘तुम्ही कोण? कुठल्या? कशासाठी आलात? ब्ल्यू प्रिंट वाचली का?’ सत्तासुंदरी गांगरून गेली. ‘अरे, आपण याची परीक्षा घ्यायला आलो आहोत की द्यायला आलो आहोत’ हेच तिला कळेना.
मग तिने राजमहाराजांना समजावून सांगितले. तरीही ते ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. त्यांनी पर्यटन आणि राज्याचा विकास यावर दहा मिनिटे लेक्चर दिले. सत्तासुंदरीने ते शांतपणे ऐकून घेतले व म्हणाली, ‘आपले सर्व काही म्हणणे मांडून झाले असेल तर मी आपणास एक प्रश्न विचारू शकते का?’ राजमहाराज म्हणाले, ‘बेशक, म्हणजे काय, तुमचा तो हक्कच आहे. परवा नाशिकमध्ये असेच झाले. एक जण आला माझ्याकडे व प्रश्न विचारण्याची परवानगी मागू लागला. मी म्हटले, ‘अरे, हा तर तुझा हक्कच आहे. विचार तुला काय विचारायचे आहे ते.’ सत्तासुंदरीने प्रश्न टाकला, ‘निवडणुकीनंतर तुमच्या सेनेचे व त्या सेनेचे मनोमिलन होणार की नाही? तुम्ही भाऊ-भाऊ एकत्र येणार की नाही?’ हा प्रश्न ऐकल्यावर राजमहाराज विचारात पडले. इतर वेळी पत्रकारांनी असा प्रश्न विचारला असता चिडून वैतागून उत्तर दिले असते, मात्र आता प्रश्न थेट सत्तेचा होता. त्यामुळे राजमहाराजांना नक्की काय सांगावे हे सुचेना. बराच वेळ उत्तराची वाट पाहून सत्तासुंदरी सुहास्य वदनाने ‘कृष्णकुंज’मधून बाहेर पडली.

मग ती थेट कलानगरात ‘मातोश्री’वर दाखल झाली. सत्तासुंदरीच्या आगमनाची सेनेच्या धाकल्या महाराजांना वर्दी देण्यात आली. त्यांनी युवराज आदित्यला तिच्या स्वागतासाठी पाठवले. युवराजांनी रीतसर स्वागत करून सत्तासुंदरीला धाकल्या महाराजांसमोर आणले. सत्तासुंदरीने आपल्या येण्याचे प्रयोजन धाकल्या महाराजांना सांगितले. धाकल्या महाराजांनी मिलिंदरावांना फोनवरून सर्व कळवले व त्यांचा सल्ला मागितला. मिलिंदरावांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर धाकल्या महाराजांनी प्रश्न विचारण्याची परवानगी दिली. सत्तासुंदरीने धाकल्या महाराजांना प्रश्न विचारला, ‘२५ वर्षांची युती तुम्ही तोडली की कमळाबाईने?’ निवडणूक ऐन तोंडावर आली असताना या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे, असा पेच धाकल्या महाराजांना पडला. बराच वेळ वाट पाहूनही सत्तासुंदरीला उत्तर मिळाले नाही.
मग ती निघाली आणखी वरपरीक्षा घेण्यासाठी....

रिंग मास्टर