आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण भाग3 : काव्याचार्यांची परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्तासुंदरीच्या वरपरीक्षेची चर्चा एव्हाना राज्यात सर्वत्र गाजू लागली. पहिल्या दिवशी सिंचनमित्र दादा, नितीनभौ नागपूरकर आणि श्रेष्ठीमान्य बाबा या तिघांची परीक्षा तिने घेतली. दुस-या दिवशी तिने सेनेचे धाकले महाराज व राजमहाराजांना प्रश्न विचारले. प्रत्येक इच्छुकाला एक प्रश्न विचारायचा, त्याचे उत्तर आले नाही तर दुस-याकडे वळायचे, या नियमात पहिले पाचही जण न बसल्याने सत्तासुंदरीपुढे इतरांकडे जाण्यावाचून मार्ग नव्हता. सेनेच्या धाकल्या महाराजांनी दिलेली उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर झुगारून कमळाबाईचा पदर धरलेले काव्याचार्य कमळाचार्याच्या दौ-यामुळे काही दिवस व्यग्र होते. त्यांचा शीण घालवण्यासाठी काव्याचार्य नव्या कविता रचत बसले होते. यमकांची जुळवाजुळव टप्प्यात आलेली असतानाच सत्तासुंदरी तेथे आली. तिला पाहताच काव्याचार्यांना एक कविता सुचली, ‘तुम्ही तर आहात सत्तेच्या सखी, माझ्याकडे आहे सावंताची राखी..’ सत्तासुंदरीने त्याकडे दुर्लक्ष करत काव्याचार्यांना प्रश्न विचारला, ‘आतापर्यंत तुम्ही किती वेळा कोणाशी युती केली, त्या त्या वेळी त्या त्या पक्षांनी तुम्हाला काय काय ऑफर दिल्या होत्या, हे तारीखवार सांगा.’ काव्याचार्यांनी पटकन आठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आतापर्यंत हा खटाटोप इतक्या वेळा केला होता की त्यांचा पार गोंधळ उडाला. ते काहीच सांगू शकले नाहीत... सत्तासुंदरी वाट पाहून निघून गेली. नागपुरातील सभेत खुद्द कमळाचार्यांनी स्तुती केल्याने कमळाबाईचे चतुरपंडित फडणीस अगदी खुशीत होते. त्यांचे पाऊल जमिनीवर पडतच नव्हते, आपण अधांतरी चालत आहोत आणि समोरून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आपल्याकडे येत आहे, असे चित्र त्यांना जागेपणीच दिसत होते. तेवढ्यात सत्तासुंदरी त्यांच्याकडे आली. प्रथम चतुरपंडितांना कळेचना, त्यांनी हळूच स्वत:ला चिमटा घेतला व आपण जागे आहोत याची खात्री करून घेतली. अत्यंत अदबीने त्यांनी कमरेपासून लवून सत्तासुंदरीला नमस्कार केला. सत्तासुंदरीने मग त्यांना प्रश्न विचारला, ‘बाणदादाशी ऐनवेळी युती कोणी तोडली?’ सत्तासुंदरीच्या या गुगलीने चतुरपंडित चक्रावले. मुख्यमंत्रिपद अगदी आठ दिवसांवर असताना याचे उत्तर नेमके काय दिले तर आपल्या सोयीचे राहील हे चतुरपंडितांना कळेना. ते विचारात पडले. बराच वेळ वाट पाहून सत्तासुंदरी आपल्या घरी परतली. तेवढ्यात तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश आला. पहिल्या पाच वरांनी तिला व्हॉट्सअ‍ॅपवर उत्तरे कळवली होती.इतर दोघांचेही उत्तरांचे मेसेज येतील याची सत्तासुंदरीला खात्री होती. मग सत्तासुंदरीने सर्वांना रिप्लाय मेसेज दिला. ‘धीर धरा.... १९ तारखेकडे लक्ष ठेवा...’
रिंग मास्टर