आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण - ‘सही’ राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकीच्या आखाड्यातील रणधुमाळी आता शिगेला पोहोचणार आहे. प्रचाराच्या धुरळ्यात आश्वासनांचे फुसके फवारे जोरदार उडणार आहेत. कमळाबाईचे कर्तेधर्ते स्वत: आता मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे प्रचाराचा धडाका उडणार आहे. त्यातच सह्यांचे प्रकरण चांगले गाजत आहे. कोणी कोठे कधी केव्हा कशी सही केली किंवा केली नाही यावरून तयार झालेले चविष्ट किस्से व जोक्स व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी सामाजिक कट्ट्यांवरून अनेकांचे रंजन करत आहेत. घड्याळाच्या मंडपात प्रचाराची घाई चालली आहे. पुलोदस्वामी काकामहाराज महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आपले पुतणे तथा सिंचनमित्र दादा व मफलरस्वामी छगनभाऊ यांना काकामहाराजांनी उत्तम प्रशासकाचे जाहीर सर्टिफिकेट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घड्याळाच्या मंडपातील अनेक चावीबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.
अशीच एक सभा आटोपून पुलोदस्वामी काकामहाराज मंडपात विश्रांतीसाठी आले. त्या वेळी सिंचनमित्र दादा, मफलरस्वामी छगनभाऊ, ग्रामभूषण जयंतराव मामा आदी गप्पा मारत बसले होते. काकामहाराज आले व थेट आपल्या दालनात आराम करण्यास गेले. जयंतराव मामांनी दादांना विचारले, ‘काकामहाराजांनी तर तुम्हाला आता उत्तम प्रशासक म्हटले आहे. मजा आहे तुमची.’
‘काकांचा काय तरी हेतू असावा ’ मफलरस्वामींनी आपल्या अनुभवी स्वरात उत्तर दिले. तसे दादा सावध झाले.
‘नक्कीच कायतरी भानगड आहे त्या ठिकाणी’ दादांनी शंका काढली.
दादांच्या शंकेने जयंतमामा, मफलरस्वामींच्या बेचैनीत भर पडली.
सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. तेवढ्यात काकामहाराज त्यांच्या दालनातून बाहेर थेट त्यांच्याचकडे आले. सर्वांनी उभे राहून काकामहाराजांना बसायला जागा दिली. ‘बसा बसा, असे उभे का?’ काकांनी सर्वांना बसायला सांगितले. सर्वजण बसले. मग मफलरस्वामींनी सर्वांवर नजर टाकत हळू आवाजात काकांना विचारले, ‘हे उत्तम प्रशासकाचे प्रकरण आहे तरी काय?’
काकामहाराज नेहमीप्रमाणे हसल्यासारखे केले व सांगू लागले, ‘एक तर आपल्याला २८८ उमेदवार उभे करावे लागले. त्यातच वेळ अगदी कमी. नेहमीप्रमाणे आपल्याकडे भाषणांतून मांडायला मुद्देच नाहीत. मग मीच विचार केला, की त्या फायलीवर सही झाली असती त्या ‘बाबा’ची, तर काय मुश्कील झाली असती दादांची व पक्षाची. दादांनी नेहमीच ‘बाबा’ला परेशान केले. त्यांना त्या फायलीवर सही करू दिली नाही, वर राजीनामा देऊन त्यांची गोची केली. म्हणून मी दादाला उत्तम प्रशासक मानतो असे जाहीर केले. त्यामुळे चर्चेला नवा मुद्दा मिळाला. आणि नव्या तर्कवितर्काला संधी मिळाली आणि निकालानंतर संधी मिळालीच तर दादांचा मार्ग मोकळा केला मी.’ ते ऐकताच मफलरस्वामींचा चेहरा मात्र खार्रकन उतरला.