आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण - काकांची योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जा गावाटपाचे गुऱ्हाळ आता संपणार्‍या कापूसकोंड्याच्या गोष्टीकडे झुकले आहे. या सार्‍या कुटाण्याने वैतागलेले धरणमित्र दादा काटेवाडीच्या फार्महाऊसवर चक्कर मारायला गेले. तिथल्या मोकळ्या हवेने दादांची ‘सटकलेली’ पुन्हा स्थिरस्थावर झाली. शिवाराला एक चक्कर मारल्यावर दादांना बरेच फ्रेश वाटू लागले. दादांनी आंब्याच्या झाडाखाली ठेवलेल्या वेताच्या खुर्चीवर बैठक मारली आणि बाबूला आवाज दिला.
बाबू जरा चहा आण, अद्रक मारलेला, या ठिकाणी.’ तेवढ्यात सिंचनकार सुनीलराव, ग्रामकेसरी जयंतमामा, सा.बां. सरदार छगनराव मफलरवाले तेथे आले.
‘या, या, या ठिकाणी स्वागत आहे तुमचे.’ दादांनी सर्वांना बसायला खुर्च्या दिल्या चहाची ऑर्डर वाढवली.
‘बोला सुनीलराव काय हालहवाल?’
‘पटेलसाहेबांनी अल्टिमेटम कळवला ‘हात’करांना.’
‘१४४ ची मागणी रेटून धरलीया त्यात.’ जयंतमामांनी माहिती पुरवली.
‘काकांना विचारूनच केलंय सगळं,’ मफरल नीट करत छगनरावांनी अधिक माहिती सांगितली.
‘दोन दिवस झाले, त्या ठिकाणी अल्टिमेटम देऊन...’ दादांनी घड्याळात पाहत विचारले.
‘हातकरांनी केराची टोपली दाखवली म्हणतात आपल्या अल्टिमेटमला, तसं छापून आलंय पेपरात...’ छगनरावांनी नेमकी दुखरी नस पकडली.
हे ऐकताच दादांची पुन्हा सटकली. दादा तावातावाने ओरडू लागले, ‘मला राग येतोय.. मला राग येतोय...’
जयंतमामा, छगनरावांनी दादांना कसेबसे शांत केले. दादा घुश्श्यातच म्हणाले, ‘सरळ स्वबळावर लढायचं, त्या ठिकाणी सोडून अल्टिमेटम कशाला पाठवत बसले, त्या ठिकाणी.’
‘तसं नाही आघाडी म्हणल्यावर हे समदं करावचं लागतंय.’ छगनरावांनी अनुभवी बोल सुनावले.
‘महायुतीचं बी तुटोस्तोवर ताणलयचं की...’ जयंतमामा बोलले.
तशी दादांची कळी खुलली. ते म्हणाले, ‘हे मात्र बेस्ट झाले त्या ठिकाणी.’
तितक्यात बगलेत फायली मारलेले काका तेथे आले सर्वांकडे पाहत म्हणाले, ‘काय मंडळी, काय चाललंय?’
‘काय नाय जागावाटपाची चर्चा करतोय या ठिकाणी.’ दादा उद‌्गारले.
‘स्वबळावर लढू म्हणतेत दादा,’ छगनरावांनी काकांना माहिती पुरवली.
खुर्चीवर बसत काकांनी त्यांच्या खास ठेवणीतल्या आवाजात सर्वांना समजावले, ‘आता महायुतीचं काही खरे दिसेना, ‘हात’वाले जास्त नखरे करायला लागलेत. कमळवाल्यांशी माझी बोलणी सुरू आहे. उद्धवला तर मी लहानपणापासून ओळखतो. निवडणुकीनंतर घड्याळाला चांगले दिवस येणार आहेत. तेव्हा कामाला लागा.’
काकांचे बालणे संपले आणि प्रत्येकाने आपापल्या परीने काकांच्या योजनेवर विचार करत अद्रकवाल्या चहाचे कप तोंडाला लावले.