चौंडी (जि. नगर) - ‘पंकजामुंडे यांच्या संघर्ष यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावरून राज्यात भाजपचेच सरकार येणार यात शंका राहिलेली नाही. या यात्रेचा आज समारोप होत असला तरी भाजपची परिवर्तन यात्रा आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे पंकजांनी एवढ्यावरच थांबता राज्यभर फिरुन भाजपचे सरकार आणावे,’ अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांनी पंकजा यांच्या राज्यस्तरीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले.
पंकजा यांच्या संघर्ष यात्रेचा समारोप गुरुवारी चौंडीत (जि. नगर) झाला. यानिमित्त आयोजित सभेत शहा बोलत होते. कार्यक्रम सुरू होताच उपस्थित लोकांनी पंकजा यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी घोषणाबाजी सुरू केली. ‘हमारी पीएम महाराष्ट्र की पीएम’ असे फलकही झळकावले. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी तर व्यासपीठावरून थेट ही मागणी मांडली. ‘पंकजा यांचे नाव जाहीर केल्यास बहुजन समाज पाठीशी राहील,’ असेही त्यांनी सांिगतले. मात्र शहा यांनी भाषणात मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख टाळत भाजपची सत्ता आणा, एवढेच आवाहन केले. ‘मुंडेंच्या निधनाने महाराष्ट्र दु:खात बुडाला. मात्र दु:ख बाजूला सारत पंकजा यांनी केलेला संघर्ष कौतुकास्पद आहे,’ अशी शाबासकीही शहा यांनी दिली.
लोकांसाठीच बाहेर पडले : पंकजा
मला उभे करणारे गरीब फाटके लोक आहेत. मोठी कोणतीही व्यक्ती त्यामागे नाही. पिता गेल्याचे दु:ख, वैयक्तिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून या लोकांसाठीच बाहेर पडले आहे. अफवा, वाईट गोष्टींना बळी पडता मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन करताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.
भाषणात अडथळे
या मेळाव्याला चौंडीत मोठी गर्दी जमली होती. व्यासपीठासमोरचे कार्यकर्ते पंकजा यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करा, अशी घोषणाबाजी सातत्याने करत वक्त्यांच्या भाषणात अडथळे आणत होते. पंकजा त्यांना सातत्याने तसे करण्याची विनंती करत होत्या. मात्र, लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करून अडथळे आणणे सुरूच ठेवले. शहा यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीही पंकजांनी उपस्थितांना शांत राहण्याची विनंती केली, त्यानंतर घोषणाबाजी बंद झाली.