कोल्हापूर/पुणे - ‘काँग्रेस मुक्तभारत करताना भाजपयुक्त महाराष्ट्र करण्याची गरज आहे,’ असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांनी गुरुवारी कोल्हापुरात केले. महायुतीतील वादावर भाष्य करताना ‘जागावाटप सन्मानाने व्हावे त्यात समाधानही व्हावे,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आम्ही दोन पावले समझोत्यासाठी पुढं टाकली आहेत. तुम्ही पुढं या, लवकरात लवकर निर्णय घ्या, असे सांगताना शहा यांनी शिवसेनेचे मात्र एकदाही नाव घेतले नाही. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणा, असे ते वारंवार सांगत होते, हे विशेष.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना ‘या देशात राजकारणाच्या बाजारीकरणाची सुरुवात पवारांनीच केली’, अशी टीकाही शहा यांनी केली. दोनच दिवसांपूर्वी पवारांनी कोल्हापुरातील सभेत शहा यांना फटकारले होते. चौंडी (जि. नगर) येथील मेळाव्याला जाण्यापूर्वी गुरुवारी सकाळी शहा
आपली सासुरवाडी असलेल्या कोल्हापुरात आले होते. सकाळी त्यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शनही घेतले. पत्रकारांशी बोलताना शहा म्हणाले की, ‘कोल्हापूरशी माझे मनाचे नाते आहे. माता अंबाबाई, शाहू महाराज आणि ताराराणी यांच्या या पवित्र भूमीतून मी प्रचाराला आज सुरुवात करत आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
आघाडीचेमंत्री जेलमध्ये जातील
पुण्यातीलजाहीर सभेत आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना शहा म्हणाले की, ‘एक वेळ अशी होती की देशाचे नेतृत्व महाराष्ट्र करत होता, उद्योग, कृषि, सहकार, सिंचन या सर्वच बाबतीत हे राज्य अग्रगण्य होते. परंतु दोन्ही कॉग्रेसच्या भ्रष्ट कारभारामुळे महाराष्ट्र १५ वर्षांत सर्वच बाबतीत मागे राहिला आहे. आघाडीने केलेल्या घोटाळ्यांची यादी वाचायला खूप वेळ लागेल. यांच्याकडून चौकशीची नाटकं केली जातात. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांनी राजीनामा दिला. परत दोन महिन्यांत ते उपमुख्यमंत्री झाले. खरी चौकशी झाली तर दोन्ही कॉंग्रेसमधील एकही मंत्री जेलच्या बाहेर दिसणार नाही,’ असा आरोपही त्यांनी केला. या सत्ताधाऱ्यांनी राज्याचा सगळा खजिनाच खाली केला आहे. मात्र महाराष्ट्राला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असल्याचे शहा म्हणाले.
बाजारीकरणात शहा माहीर: भुजबळ
येवला - ‘खरेतर राजकारणाचे बाजारीकरण करण्यात अमित शहा हे माहीर आहेत. त्यांना शरद पवार यांचे योगदान काय माहीत?’ असा सवाल करत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी शहा यांचा समाचार घेतला. शहा यांनी बाजार बाजारभाव पाहावेत, दुसऱ्यांना नाव ठेवण्याचे काम करू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला. अमित शहा यांनी कोल्हापूर येथे पवारांवर टीका केली होती. त्यावर ‘यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पवारसाहेबांमुळेच महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा मिळाली आहे,' असे भुजबळ म्हणाले.
राजकारण कमी समाजकारण अधिक करणारा हा नेता असून राज्यात सहकार चळवळ, शैक्षणिक प्रगती, ओबीसी, मुस्लीम आरक्षण, मराठवाडा विद्यापीठ नामांतरण यासाठी पवारांचे अमूल्य योगदान असल्याचे भुजबळ म्हणाले.
जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला अन् महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून पवार साहेब करत आहेत. विकास अन् समाजकारणात इतके काम करणारा एकही नेता भाजपात नाही. असंख्य गोष्टीत प्रत्यक्ष काम करून योगदान शहा यांनी कधी दिले का? असा सवालही त्यांनी केला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी सपत्नीक कोल्हापुरात येऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. या वेळी मंदिर प्रशासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर ही शहा यांची सासुरवाडी आहे, हे विशेष.
बाजारीकरणात शहा माहीर : भुजबळ
शहा यांच्या स्वागताला दोन्ही कॉंग्रेसची नेतेमंडळी उपस्थित होती. त्यात गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, कॉंग्रेसचे आमदार असलेले महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव अमोल महाडिक, दिग्वजिय खानविलकर यांचे चिरंजीव विश्ववजिय, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा निवेदिता माने यांचे चिरंजीव सत्वशील माने उपस्थित होते.
अजितदादांची 'ट'रकली
हजार ४७५ दिवस सत्ता असतानाही जी टोलमाफी दिली नाही ती आता शंभर दिवसात करण्याचे आश्वासन अजित पवार देत आहेत. मात्र आता जनताच त्यांना म्हणू लागलीय ‘आली रे आली आता तुझी बारी आली.' त्यामुळे अजितदादांची सटकली नसून 'टरकली' आहे. लोकसभेत लोकांनी एवढे बडवल्यानंतरही त्यांची टिवटीव थांबलेली नाही.
विनोद तावडे, भाजपचेनेते तथा विरोधी पक्षनेते
बारामतीत विमान उतरलेच नाही
बारामती - कोल्हापुरातशरद पवारांवर टीका करणारे अमित शहा गुरुवारी काही काळासाठी पवारांच्या बारामतीत येणार होते, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे विमान उतरू शकले नाही. कोल्हापूरहून चौंडीला (जि. नगर) जाताना शहा काही काळासाठी बारामतीत थांबणार होते, अशी माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात शहा वापरत असलेले फाल्कन जातीचे विमान भव्यदिव्य १६ टन असल्यामुळे ते बारामतीच्या विमानतळावर उतरू शकत नसल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे बारामतीला ‘बायपास’ करून शहा थेट चौंडीला निघून गेले. त्यामुळे येथील विमानतळ नियंत्रण कक्षाला शहा यांच्या दौर्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे.
शहांच्या स्वागताला काँग्रेस नेत्यांची मुले
शहा यांच्या स्वागताला दोन्ही कॉंग्रेसची नेतेमंडळी उपस्थित होती. त्यात गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, कॉंग्रेसचे आमदार असलेले महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव अमोल महाडिक, दिग्वजिय खानविलकर यांचे चिरंजीव विश्ववजिय, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा निवेदिता माने यांचे चिरंजीव सत्वशील माने उपस्थित होते.