मुंबई - काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागांचा तिढा सुटण्याचे लक्षण दिसत नाहीत. काँग्रेसचा १२४ जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळत निम्म्या १४४ जागांची आग्रही भूमिका मांडली आहे. जागा वाटपाचा हा पेच सोडविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची मंगळवारी सकाळी बैठक होणार आहे.
काँग्रेसला अल्टिमेटम देण्याची भाषा बोलणारी राष्ट्रवादी आता मवाळ होत, अल्टिमेटम आम्ही दिला नव्हता, असा पवित्रा घेऊ लागली आहे. तर नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून परतणारे मुख्यमंत्री आता काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीशी वाटाघाटी करणार आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर लगेचच शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेससोबत सोमवारी उशिरा चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते दिल्लीत असल्याने ही बैठक आता मंगळवारी सकाळी होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत काँग्रेसकडून देण्यात आलेला १२४ जागांचा प्रस्ताव फेटाळून निम्म्या १४४ जागांची मागणी रेटण्यात आली. ही मागणी रेटतानाच मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीत व्यावहारिक तोडगा निघेल, अशी आशाही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.
प्रत्येकाची पक्ष वाढवण्याची इच्छा
राजकीय परिस्थिती पाहून आघाडी, युती कराव्या लागतात. पण, त्या करताना प्रत्येक पक्षाची
आपली ताकद वाढवण्याची इच्छा असते. ताकद वाढली तरच भविष्यात पक्ष टिकू शकतो. त्यामुळे मित्रपक्षांबरोबर जागा वाटपाची चर्चा करताना फार नमते घेऊन चालत नाही, असा सूचक इशारा पटेल यांनी दिला.