आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sena MNS Alliance Gossip In Nashik City News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेने इच्छुकांच्या उरात धडकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिवसेना-महाराष्ट्रनवनिर्माण सेना युतीबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर नाट्यमय घडामोडी घडल्याने दोन्ही पक्षांतील उमेदवारी निश्चित झालेल्या अनेक उमेदवारांच्या उरात धडकी भरली. दोन्ही पक्ष पदाधिकारी काही उमेदवारांना दिलेले ए. बी. फॉर्मही परत घेतल्याचे वृत्त असून, मनसेकडून जिल्ह्यातील पंधरापैकी सहा मतदारसंघांवर दावा होणार आहे. शिवसेनेला नऊ मतदारसंघ मिळणार असल्यामुळे साहजिकच त्यांच्याकडूनही होकाराची शक्यता आहे.

भाजप बरोबरची महायुती तुटल्यानंतर शिवसेनेने निर्णायक खेळी करीत मनसेला सोबत घेण्याची तयारी चालवल्याचे वृत्त शुक्रवारी दुपारी आले. नाशिकचा विचार केला, तर येथे ठाकरे बंधूंचा करिष्मा असून, शहरातील तीन मतदारसंघ मनसेकडे, तर ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद आहे. भाजपचा विचार केला, तर जेमतेम एकच आमदार आहे. दोन्ही लोकसभा निवडणुकींचा विचार केला, तर शिवसेना मनसेच्या उमेदवारांची बेरीज कोणत्याही आघाडी वा युतीला ओलांडणे शक्य नाही. महापालिकेत विचार केला, तर शिवसेना मनसेचेच अधिक नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शनिवारी ठाकरे बंधू एकत्र आले, तर नाशिकमधील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील तीन मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत.

या मतदारसंघांवर संघर्षाची चिन्हे
शहरात नाशिक मध्य हाच मतदारसंघ दोघांमध्ये कळीचा ठरण्याची शक्यता आहे. येथे शिवसेनेकडून महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, हा मतदारसंघ मनसेचे प्रदेश चिटणीस तथा आमदार वसंत गिते यांचा असल्यामुळे या मतदारसंघावरून संघर्षाची चिन्हे आहेत.
..यांच्या उरात भरली धडकी
दोन्ही पक्षांतील प्रमुख उमेदवारांचे ए. बी. फॉर्म परत घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी डमी अर्ज भरल्याचे कारण देत शनिवारी शक्तिप्रदर्शनाद्वारे ए. बी. फॉर्मसह अर्ज भरणार असल्याचे सांगितले. मात्र, यामुळे उमेदवारांसह इतर इच्छुकांच्या उरातही धडकी भरली आहे.
अशी होऊ शकते संभाव्य वाटणी
शिवसेनेकडून सिन्नर, येवला, कळवण या तीन मतदारसंघांवर दावा होऊ शकेल. मनसेला चांदवड, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, नांदगावची जागा मिळू शकते. याव्यतिरिक्त शिवसेना बागलाण मतदारसंघावर दावा करू शकेल. मालेगाव मध्य मतदारसंघाबाबत शिवसेना मनसे चर्चेद्वारे मार्ग काढू शकतात.