Home | Election 2014 | Maharashtra Election | News | NCP Chief Sharad Pawar playing a role of king maker in Maharashtra politics

ANALYSIS: शरद पवारजी तुसी ग्रेट हो... वाचा पवारांची फिनिक्स भरारी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2014, 01:46 PM IST

देशाचा पंतप्रधान होण्याची कुवत असलेला, पण संधी न मिळालेला हा नेता आजही भल्याभल्यांना चीतपट करु शकतो हे नवोदितांसाठी राजकारणाचे एक आदर्श उदाहरण आहे.

 • NCP Chief Sharad Pawar playing a role of king maker in Maharashtra politics
  महाराष्ट्रातील राजकारणाचा विषय असला, की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख येतोच. त्याचे कारणही तसेच आहे. गेल्या काही दशकांपासून पवारांनी राज्याच्या राजकारणात कायम किंगमेकरची भूमिका बजावलेली आहे. पवार सत्तेत असो किंवा नसो त्यांची भूमिका कायम चर्चेत राहिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला समाधानकारक जागा मिळू शकल्या नाहीत. तरीही मुरब्बी राजकारण्याप्रमाणे पवारांनी भाजप आणि शिवसेनेला खेळवत ठेवले. याचे सर्व क्रेडिट केवळ पवारांना जाते. देशाचा पंतप्रधान होण्याची कुवत असलेला, पण संधी न मिळालेला हा नेता आजही भल्याभल्यांना चीतपट करु शकतो हे नवोदितांसाठी राजकारणाचे एक आदर्श उदाहरण आहे. जाणून घेऊयात... शरद पवार यांनी कशी केली परिस्थितीवर मात... विरोधकांना कसे पाजले पाणी...
  यशवंतराव चव्हाण हे पवारांचे राजकीय गुरु समजले जातात. 1967 मध्ये शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या तिकीटावर महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला. 1978 मध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर जनता पक्षासोबत आघाडी करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. एवढ्या कमी वयात तेही कॉंग्रेसची सोबत न घेता राज्याच्या सर्वोच्च स्थानावर ते विराजमान झाले होते. देशातील राजकारणात शरद पवार निश्चितच एक मोठी भूमिका बजावतील हे यावेळीच सिद्ध झाले.
  इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर हे सरकार बरखास्त करण्यात आले. 1980 च्या सुमारास ते इंडियन नॅशनल कॉंग्रेस (सोशलिस्ट) या पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर लोकसभेवर निवडून गेले. पण त्यांना राज्याच्या राजकारणात रमायचे होते. बारामती मतदारसंघातून ते राज्यात स्थायीक झाले.
  तेव्हापासून शरद पवार महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक प्रमुख नाव झाले आहे.
  त्यांच्या भूमिकेशिवाय राज्यातील राजकारणाचे पानही हलत नाही हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर आता पवार संपले असे सांगितले जात होते. पण पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना करुन सोनियांना त्यांच्यासोबत आघाडी करण्यास भाग पाडले. शिवाय कमी खासदार असतानाही केंद्रात कृषिमंत्र्यासारखे महत्त्वाचे खाते मिळवले.
  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्या. तरीही सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांना सत्तेपासून रोखून धरण्यात पवार यशस्वी झाले आहेत. महायुतीत मिठाचा खडा टाकून सत्ता समिकरणे पार बदलून टाकली आहेत.
  पुढील स्लाईडवर वाचा, या निवडणुकीत शरद पवार यांनी कशी घेतली फिनिक्स भरारी... पक्षाला कमी जागा मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत असताना कशी केली आव्हानांवर मात... कसा सिद्ध केला राजकीय मुरब्बीपणा...
  (फोटो सौजन्य- गुगल)

 • NCP Chief Sharad Pawar playing a role of king maker in Maharashtra politics
  लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्रात अगदी भूईसपाट झाली असे म्हणता येऊ शकते. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार होत्या. त्यातही या दोन पक्षांची स्थिती फारशी चांगली राहणार नाही याचे संकेत तेव्हाच मिळत होते. पवारांना याची नेमकी जाणिव होती. लोकसभेत मात मिळाल्यानंतर विधानसभेतही फार कमी जागा निवडून आल्या असत्या तर राज्यातील पवार फॅक्टर केव्हाच संपुष्टात आला असता. पण पवारांना त्यांची किंगमेकरी भूमिका सोडायची नव्हती. त्यादिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले. 
   
 • NCP Chief Sharad Pawar playing a role of king maker in Maharashtra politics
  लोकसभा निवडणुकीपूर्वीही शरद पवार यांना कल्पना होती, की यावेळी त्यांच्या आणि कॉंग्रेसच्या कमी जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेर ही खेळी अयशस्वी ठरली. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना दिशाहिन करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही युती तोडा आम्ही आघाडी तोडतो या दिशेने प्रयत्न सुरु केले. पवारांना ठावूक होते, की असे झाले नाही तर राष्ट्रवादीच्या अगदी काहीच जागा जिंकून येतील. अखेर युती तुटली. त्यानंतर आघाडी तोडून पवारांनी जनतेच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण केली. अपयशाचे खापर कॉंग्रेसवर फोडले. जोरदार प्रचार सुरु केला. पण तरीही कमी जागा निवडून आल्या.
   
 • NCP Chief Sharad Pawar playing a role of king maker in Maharashtra politics
  विधानसभा निवडणुकीत कमी जागा निवडून आल्या तरी पवारांनी पराभव स्विकारला नाही. फार वेळ न दवडता भाजपला बाहेरुन पाठिंबा जाहिर केला. यामुळे शिवसेना गोंधळली. भाजपही जास्त जागा मिळाल्याचा आव आणून मिरवू लागली. जी सत्ता दोघांना अगदी सहज मिळाली असती त्यासाठी भांडणे सुरू झाली. नाराजी एवढी टोकाला गेली, की एकमेकांना शह-काटशह देण्याचा प्रयत्न सुरु झाला. ही भांडणे एवढी विकोपाला गेली आहेत, की अजूनही दोन्ही पक्षांमधून विस्तव जाताना दिसून येत नाही. 
   
 • NCP Chief Sharad Pawar playing a role of king maker in Maharashtra politics
  अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात फेरनिवडणुका होऊ शकतात. काल झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी सांगितले, की भाजपला बाहेरुन असलेला आमचा पाठिंबा केवळ राज्याच्या हितासाठी आहे. तो सर्वच मुद्द्यांवर आहे असे समजू नये. म्हणजेच ते केव्हाही हा पाठिंबा काढू शकतात. सद्यस्थितीत भाजप आणि सेनेला स्पष्ट बहुमत आहे. पण दोघांमधील भांडणांना जनता कंटाळली आहे. आता जर फेरनिवडणुका झाल्या तर राष्ट्रवादीला जास्त जागा मिळू शकतील. शरद पवार पुन्हा सत्तेत येऊ शकतात. कारण आता राज्यात स्थिर सरकार येण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. दोन वर्षांनीही निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादीला सत्तेत येण्याची संधी राहिल, हे नाकारता येत नाही.  
   

Trending