मुंबई- शुक्रवारी महायुतीची सकाळ उजाडली तीच मुळात एकमेकांना आव्हाने देत.. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी ‘सूत्रां’च्या हवाल्याने महायुती तुटल्याची टिमकी वाजवताच शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली. पण जसजसा दिवस पुढे सरकू लागला तशी महायुती तुटण्याची शक्यताही मावळू लागली आणि गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांच्या साथीने ओढत असलेल्या युतीच्या संसारावरील ‘काडीमोडा’चे संकट दूर झाले.
गुरुवारी रात्री शिवसेनेने भाजपला मित्रपक्षांसह ११९ जागा देण्याचा अंतिम प्रस्ताव पाठवला. भाजपनेही तो लगोलग फेटाळला आणि युतीतील संबंधातला निवळत चाललेला तणाव पुन्हा एकदा वाढला. त्यामुळे सकाळपासूनच युती टिकणार की तुटणार या चर्चेला उधाण आले. त्यातच वृत्तवाहिन्यांनी थेट युती तुटल्याचे कपोलकल्पित बातम्या देऊन या आगीत तेल ओतले. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. काही वेळातच शिवसेना भाजप दोन्ही पक्षात हालचालींना वेग आला.
घटकपक्ष अस्वस्थ
युतीतुटण्याच्या बातम्यांनी घटक पक्षही धास्तावले. महादेव जानकर, राजू शेट्टी आणि आठवलेंच्या गोटातही खळबळ माजली. ‘भले आमच्या जागा कमी करा, पण कसेही करून महायुती टिकवा’ अशा अगतिकतेपर्यंत हे नेते येऊन ठेपले. तिकडे आघाडीतही बिघाडी होणार अशा वावड्या उठू लागल्या.
दुपारच्या सुमारास भाजपच्या कोअर कमिटीची बैठक खडसेंच्या निवासस्थानी सुरू झाली. पंतप्रधानांचा निरोप घेऊन राज्यातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत येणार अशा बातम्याही येऊ लागल्या. काही वेळातच मुनगंटीवार आणि खडसेंची पत्रकार परिषद सुरू झाली. मात्र या पत्रकार परिषदेत दोन्ही भाजप नेत्यांनी महायुती टिकवण्याच्या भाजपच्या कोअर कमिटीने सर्वानुमते घेतलेल्या निर्णयाची घोषणा केली आणि तणाव निवळायला सुरूवात झाली. असे असले तरी जागावाटप सन्मानाने व्हावे असा
आपला हेकाही भाजपने कायम ठेवला. फक्त भाजपनेच त्याग करावा हे काही योग्य नाही असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी त्यातल्या त्यात शिवसेनेला सुनावण्याची संधी साधली.
माजी विक्रीकर सहआयुक्त माणिक मुंडे यांनी शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेचे एक पाऊल मागे
भाजपच्या भूमिकेनंतर शिवसेनेनेही एक पाऊल मागे घेत आदित्य ठाकरे आणि ‘मातोश्री’चे विश्वासू सुभाष देसाई यांना भाजपच्या केंद्रीय समितीचे प्रभारी ओम माथूर यांच्याशी चर्चा करायला धाडले. या बैठकीनंतर देसाईंनी ‘महायुती अभेद्यच राहणार’ अशी घोषणा केली अन् कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. रात्री उशिरा माथूर आणि उद्धव ठाकरेंदरम्यान आणखी एक बैठक होण्याच्या बातमीनेही हे कार्यकर्ते सुखावले.
मातोश्री, भाजप कार्यालयात गर्दी
शुक्रवारी सकाळपासूनच युती तुटण्याच्या बातमीमुळे असंख्य शिवसैनिक ’मातोश्री’ आणि शिवसेनाभवनाच्या बाहेर जमू लागले. तर भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर आणि तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या एकनाथ खडसेंच्या शासकीय निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचे मोहोळ जमा झाले. त्यातच केंद्रीय मंत्री गडकरींनी पंतप्रधान
नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतल्याचे वृत्त धडकल्याने अचानक काही तरी घडणार अशा चर्चांना ऊत आला. मात्र रात्रीच्या बैठकांनी त्यांचा तणाव कमी झाला.