सोलापूर - भारतीय जनता पक्षाने शिवेसेनेसोबतची युती तोडली त्याच्या काही मिनीटांतच राष्ट्रवादीने काँग्रेससोबतची आघाडी तोडली. हा योगायोग होता का? असा सवाल उपस्थित करुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही पक्षाचे काय साटेलोटे आहे, असा सवाल केला. शिवसेनेच्या सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
शिवशक्तीसोबत भीमशक्ती
उद्धव ठाकरे यांनी प्रचाराच्या दुसर्या टप्याला सोलापुरातून सुरवात केली आहे. सभा स्थानावरील निळ्या झेंड्याकडे निर्देश करुन उद्धव म्हणाले, येथे फडकत असलेला हा निळा झेंडा शिवशक्तीसोबत भीमशक्ती असल्याचे द्योतक आहे. ते म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावी. ती एकच आहे. रामदास आठवले यांचा उल्लेख टाळून उद्धव म्हणाले, 'लोक इकडून तिकडे गेले म्हणजे समाज जात नाही.'
शिवसेना हिंदुत्ववादी आहे आणि राहाणार
भाजपने शिवसेनेसोबत युती तोडली आणि हिंदुत्वासोबतचे नातेही तोडले आहे. आमचे हिंदूत्व हे बाळासाहेबांचे हिंदूत्व आहे. मुस्लिमांना आमचा विरोध नाही. मात्र, जो मुसलामन भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाईल त्याला आमचा विरोध आहे.
सोलापूर टेक्सटाइल्स हब करणार
शिवसेनेकडे महाराष्ट्राला बदलण्याचे व्हिजन असल्याचे सागंत उद्धव यांनी सोलापूरला टेक्साटाइल्स हब करण्याच आश्वासन दिले. ते म्हणाले, औरंगाबाद, कोकणामध्ये पर्यटन हब केले जाईल. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्सटाइल्स आहे. आमचे सरकार आल्यानतंर त्यांचा अधिक विकास केला जाईल.