मुंबई - ताट वाढून तयार होते, पण कर्म दरिद्रीपणा तुम्ही केला, असा भाजपवर आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याला भाजप नेते कारणीभूत असल्याचे सांगितले. मुंबईतील बीकेसी मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रिपाई नेते अर्जुन डांगळे, खासदार संजय राऊत, रामदास कदम आदी नेते उपस्थित होते. उद्धव ठाकेर यांनी मी दिल्लीश्वरांपुढे झुकणार नाही असे सांगत, मी वाकेल तर फक्त छत्रपती शिवरायांपुढे, बाळासाहेब- माँ आणि शिवसेनेची ताकद असलेल्या शिवसैनिकांपुढे असे सांगत त्यांनी मंचावरच वाकून शिवसैनिकांना नमस्कार केला.
बाळासाहेब असते तर...
बाळासाहेब ठाकरे असते तर युती तोडण्याची हिंमतही झाली नसती, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कविता वाचून दाखवली. ते म्हणाले, आज अटलबिहारी जरी सक्रिय राजकारणात असते तरीही युती तुटली नसती, कारण त्यांना ऋणानुबंध माहित होते. सुषमा स्वराज यांच्या मर्यादा सांभाळा या वक्तव्याचा उल्लेख टाळून उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही अजून मर्यादेतच बोलत आहोत.
गुजरातमधून भाजप नेते आणि खासदार, आमदार मुंबईत प्रचार करत आहेत, ते निवडणुकीनंतर तुमच्या मदतीला येणार नाहीत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांच्या मदतीसाठी फक्त शिवसेनाच धावून येते असे सांगितले.
हरियानातील युती का तुटली?
कुलदीप बिश्नोईसोबतची युती का तोडली? याचे उत्तर आधी द्या. नवीन पटनायक यांनी भाजपला लाथ मारली तरीही मुख्यमंत्री झाले. ममता,
जयललिता, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. तेव्हा आम्ही सत्ता मिळवू शकणार नाही का? असा सवाल त्यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, 'दिल्लीच्या इशार्यावर सरकार चालते तेव्हा, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरतो.' त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा दिल्लीपुढे झकणारा नसेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र परत मिळवू.
- शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवापर्यंत 50 योजना पूर्ण करणार.
- शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटमधील मुद्दे भाजपच्या दृष्टीपत्रात.
- काँग्रेसचे जहाज बुडत आहे, त्याला बुडवायची गरज नाही.